Amravati News अमरावती : सात वर्षांपूर्वी 2 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून जलतरण तलावाच्या कामास सुरुवात झाली होती. पण सात वर्ष लोटूनसुद्धा अद्याप शहरातील जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत तर कंत्राटदार मात्र अर्धे काम सोडून गायब झालेला आहे. सोबतच येथील चेंजिंग रूम अवैध धंद्यांचे माहेरघर बनल्याचे चित्र दिसत आहे.
विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्या असून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुले जलतरण तलावात पोहण्याची मजा घेतात. परंतु उन्हाळा संपत आला तरी काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे मुलांना पोहण्यास तलाव उपलब्ध होत नाही.
तत्कालीन आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी वर्ष 2017 मध्ये शासनाकडून वरुड, शेंदूरजनाघाट व लक्ष्मीनगर येथे लोकांच्या व्यायामासाठी तसेच त्यांची प्रकृती तंदुरुस्त रहावी म्हणून निधी मंजूर करून दोन एकर जागेवर स्विमिंग टँक निर्मितीसाठी मंजुरी मिळविली होती. बांधककामाला सुरुवात केली होती परंतु ज्या ठेकेदाराला याचे काम दिले होते त्या कंत्राटदाराने बांधकामासाठी आणलेले सर्व साहित्य मशीन वापस नेल्यामुळे बांधकाम थंडबस्त्यात आहे.
या ठिकाणी बांधलेल्या चेंजिंग रूमचा वापर अवैध कार्यासाठी होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक हर्षल चौधरी यांनी केला आहे.
2017 मध्ये निधी उपलब्ध झाल्या नंतर बांधकामासाठी सर्व मशीन व साहित्य उपलब्ध करण्यात आले होते. चेंजिंग रूम, पार्किंगसोबत स्विमिंग टँकचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू झाले होते. परंतु बदलत्या स्थानीय राजकारणापोटी काम रखडल्या गेल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली.
तलावाचे फक्त 30 टक्केच काम पूर्ण झाले, सिमेंटचे टाके तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी दोन खोल्या बांधण्यात आल्या होत्या पण त्याची सुद्धा वाईट अवस्था झालेली आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून लवकरात लवकर काम सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.