Amravati News अमरावती : लोकसभा निवडणुकीमुळे अनेक विकासकामे प्रलंबित होती तर काही कामांचे आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर टेंडर (Tender) काढण्यात आले. आचारसंहितेमुळे सुरू असलेल्या कामांचे नुकसान झाले. एकीकडे विकासकार्य कधी मंजूर होतील याची वाट बघावी लागते तर दुसरीकडे मंजूर झालेले 147 कोटींच्या कामावर स्टे लावले गेले आहेत.
तब्बल 147 कोटी 75 लाख रुपये किमतीच्या अमरावती शहराच्या रस्ते विकास प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेला नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. नगरविकास विभागाने 1 जुलै रोजी काढलेल्या त्या शासन निर्णयामुळे अमरावती महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे स्थगिती देताना कारण नमूद न केल्याने एवढे मोठ्या विकास प्रकल्पास स्थगिती देण्याचे कारण तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागात स्थगितीचे पत्र धडकले असले तरी कारण त्यांना देखील माहीत नाही. राज्य शासनाने 11 मार्च 2024 च्या शासन निर्णयामुळे नगरोत्थान महाभियानाअंतर्गत अमरावती मनपा रस्ते विकास प्रकल्प मंजूर केला होता. 147.75 कोटी रुपयांच्या या रस्ते विकास प्रकल्पाला सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक मान्यता देखील दिली होती.
या प्रकल्पाचे कार्यान्वयन अमरावती मनपामार्फत करण्यात येणार होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाने अन्य अनुषंगिक प्रक्रियेस सुरवात देखील केली होती. केवळ टेंडर प्रक्रिया तेवढी शिल्लक होती. नगरोत्थानमधील या प्रकल्पांसाठी प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर अमरावती मनपाने टेंडर प्रक्रिया राबवून कार्यादेश निर्गमित करून शासनाकडे प्रथम हप्त्याच्या निधी मागणीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रकल्पासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्यात येणार होता.
शहरातील आठ रस्त्यांसाठी 103.42 कोटी रुपये राज्य शासन तर 44.33 कोटी मनपाला खर्च करावे लागणार होते. यातून नवसारी ते पाठ्यपुस्तक ते राममोहन बोर्ड, डॉ. पंजाबराव देशमुख बँक ते वली चौक, अमन बोअरवेल ते कठोरा रोड, शेगाव नाका, रहाटगावपासून एसएसडी बंगलो, तपोवन ते सात बंगला पूल ते पुढे मालू ले-आऊट, तपोवनपासून आयटीआय कॉलेज रोड व जावरकर लॉन ते रिंग रोड हे रस्ते निर्माण केले जाणार होते.
नगरविकास विभागाने 11 मार्च 2024 च्या शासन निर्णयान्वये अमरावती रस्ते विकास प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली होती. 1 जुलै रोजीच्या आदेशाने त्या मान्यतेला स्थगिती देण्यात आली. स्थगितीमागचे कारण देण्यात आलेले नाही. अशी प्रतिक्रिया महापालिका शहर अभियंता रवींद्र पवार यानी दिली.