अमरावती (Amravati) : कचऱ्याच्या डोंगरात वसलेल्या सुकळी कम्पोस्ट डेपोसह अकोली कम्पोस्ट डेपोचे बकालपण संपवण्यासाठी तेथे ग्रीन स्पेस निर्माण केली जाणार आहे. या ग्रीन स्पेसअंतर्गत बगिचा, क्रीडांगणे तयार करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. महापालिकेला तेथे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र व मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रदेखील उभारता येणार आहे.
मनपा, नगर परिषद व नगरपंचायतींमध्ये जुन्या साठलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग करून त्यानंतर पुनर्प्राप्ति होणाऱ्या जागेवर ग्रीन स्पेस निर्माण करण्याचे आदेश नगरविकास विभागाने 5 जून रोजी दिले आहेत. त्या अनुषंगाने मनपाला प्रामुख्याने सुकळी कम्पोस्ट डेपोत ग्रीन स्पेसची संकल्पना राबवावी लागणार आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून या कचऱ्याची विल्हेवाट लावून जागेची पुनर्प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. सुकळी कम्पोस्ट डेपोतील जुन्या साठलेल्या कचऱ्यावर वर्षभरापासून बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. त्या प्रक्रियेनंतर तेथील कचराभूमीच्या जागेची पुनर्प्राप्ती होणार आहे. सुकळी कम्पोस्ट डेपोत 9.35 हेक्टर जागेवर 200 टीपीडी क्षमतेच्या व अकोली येथे 2.83 हेक्टर जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित आहे. मात्र, सुकळी प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी तेथील कचऱ्याचा डोंगर नाहीसा करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने तेथे बायोमायनिंगच्या माध्यमातून 1.31 लक्ष घनमीटर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तेथे साचलेल्या संपूर्ण कचऱ्यावर डिसेंबरपर्यंत बायोमायनिंग पूर्ण होईल. त्यानंतर कचराभूमीची पुनर्प्राप्ती होईल.
कशासाठी ग्रीन स्पेस?
जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत जागेची पुनर्प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. तथापि, अनेक ठिकाणी बायोमायनिंग स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पर्यावरण पोषक पद्धतीने पुनर्प्राप्ती होत नाही. वास्तव त्या जागेचा बकालपणा कमी करण्याच्या उद्देशाने ग्रीन स्पेसचे निर्देश देण्यात आलेत.