अमरावती (Amravati) : अचलपूर येथील बंद असलेल्या फिनले मिलसाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांतच ही मिल पुन्हा सुरू होणार आहे.
फिनले मिल पूर्ववत सुरू व्हावी, गिरणी कामगारांना रोजगार मिळावा, यासाठी माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी पुढाकार घेतल्याची माहिती कामगार नेते अजय माथने यांनी दिली.
फिनले मिल सुरू व्हावी, यासाठी सातत्याने गिरणी कामगारांनी लढा दिला. या कामगारांच्या लढ्याला नेत्यांनी साथ दिली. नवनीत राणा यांनी पुढाकार घेत 26 जून रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांची दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी मिल कामगारांच्या व्यथा, समस्यांवर चर्चा झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी फिनले मिल चालविण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचे स्पष्ट केले.
आता 20 कोटींचे अनुदान मंजूर झाल्याबाबतचे पत्र केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे मिल सुरू होण्याबाबतचे अडथळे दूर झाल्याची माहिती माथने यांनी दिली.
ही मिल लवकरच सुरू होणार असून, बेरोजगार व उपासमारीशी झुंजत असलेल्या कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. आतापर्यंत 14 कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र स्थानिक आमदारांनी मिल सुरू होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, अशी खंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मात्र मिल सुरू होण्यासाठी भाजपचे नेत्यांचे प्रयत्न, गिरणी कामगारांची एकजूट आणि लढ्याचे हे यश असल्याचे मान्य केले.
अचलपूर भागासाठी फिनले मिल सुरू होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. मंत्र्यांच्या भेटी घेत गिरणी कामगारांच्या समस्या मांडल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे राज्य सरकारने 20 कोटींचा निधी मंजूर केला. आता ही फिनले मिल सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.