नागपूर (Nagpur) : दिवसेंदिवस वाढत जाणारे इंधनाचे दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण रोखणे तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘शिवाई’ ही इलेक्ट्रीक बस एसटी महामंडळात (MSRTC) नुकतीच दाखल झाली आहे. केवळ पुण्यातच धावणारी ही बस येत्या काळात नागपूरसह अमरावती विभागातही धावताना दिसणार आहे. अमरावती विभागात १०० ‘शिवाई’ लवकरच दाखल होणार असल्याची माहिती आहे. (Shivai ST Bus News)
महाराष्ट्राची ‘जीवनवाहिनी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या ‘लालपरी’ने १ जून रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (एसटी) १ जून या वर्धापन दिनी पुण्यात पहिली इलेक्ट्रीक बस ‘शिवाई’ दाखल झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील महामंडळाच्या सर्व आगारात ही बस दाखल होणार आहे. याच अंतर्गत येत्या काही महिन्यांत अमरावती विभागाला १०० ‘शिवाई’ मिळणार आहेत.
नागपूरसह अमरावती विभागातील आगारात लालपरीची संख्या सर्वात जास्त आहे. कोरोना आणि नंतर सुरू झालेल्या एसटी महामंडळाच्या संपाने ‘लालपरी’ची चाके जवळपास अडीच वर्षे थांबली होती. त्यामुळे गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला. अजूनही स्थिती पूर्वपदावर आली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय व्हायला लागली. तसेच इंधनाचे दिवसेंदिवस वाढते दर, प्रवाशांअभावी फेऱ्यात होणारे नुकसान ही समस्या सध्या महामंडळाला भेडसावत आहे. आता पर्यावरणपूरक अशी विद्युत प्रणालीवर धावणारी इलेक्ट्रीक बस महामंडळाने एसटीच्या ताफ्यात दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत ही बस राज्यातील सर्व आगारात टप्प्याटप्प्याने दाखल होईल.
‘शिवाई’ बसची वैशिष्ट्ये
- बसची लांबी : १२ मीटर
- टू बाय टू आसन व्यवस्था
- एकूण आसने : ४३
- ध्वनी व प्रदूषणविरहित, वातानुकूलित गाडी
- ताशी ८० किमी वेगाने धावणार, आवाज कमी येईल
- बॅटरी क्षमता ३२२ केव्ही, इंधनावरील खर्च कमी
- अपंगांसाठी वेगळा रॅम्प, जीपीएस युक्त
- सीसीटीव्ही कॅमेरा, आपत्कालीन सूचनेसाठी बटणांची सोय