अकोला (Akola) : अकोला जिल्हा परिषदेच्या (Akola Z P) सुमारे ५४ वर्षे जुन्या झालेल्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येणार आहे. याकरिता नागपूरच्या विश्वेश्वरय्य राष्ट्रीय प्रोद्योगिकी संस्थानला पत्र पाठवून ऑडिट करण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत येथील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत ठेवूनच काम करावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेत १४ पेक्षा जास्त विभाग असून, ४०० पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी आहेत. तसेच पदाधिकारी-सदस्य, कंत्राटदार व शासकीय याेजनाबाबत माहिती घेणे आणि अन्य कामांसाठी येणाऱ्यांची संख्याही कमी नसते. मात्र जि. प.ची इमारत मजबूत नसून, ती धाेकदायक झाली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाला सादरही झाला आहे. तत्कालीन जि.प. अध्यक्षा संध्या वाघाेडे यांनी शासनाकडे पाठ पुरावाही केला हाेता.
दरम्यानच्या काळात इमारतीच्या मुद्यावर कर्मचाऱ्यांनी थेट सीईओंनाच पत्र पाठवून उपाययाेजना करण्याची मागणी केली होती. संबंधित प्रत्राच्या प्रती जि. प. अध्यक्षासह जिल्हाधिकारी, अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही देण्यात आल्या होत्या. परंतु आता या विषयाकडे बांधकाम विभागाने लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.
१९६८मध्ये झाले हाेते उद्घाटन
जिल्हा परिषदेच्या या इमारतीचे उद्घाटन ३१ मे १९६८ राेजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत झाले हाेते. त्यामुळे तब्बल ५४ वर्षे जुनी असलेली इमारत आता जीर्ण झाली असून, पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण हाेतात.