नाशिक (Nashik) : नगर एमआयडीसीतील (Nagar MIDC) जलवाहिनीच्या कामाचे बिल काढण्यासाठी कामाच्या रकमेच्या पाच टक्के मागणी करून कंत्राटदाराकडून एक कोटी रुपये लाच स्वीकारणाऱ्या सहायक अभियंता किशोर गायकवाड व सध्या धुळे येथे कार्यरत असलेला कार्यकारी अभियंता गणेश वाघ या दोघांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे - वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखालील विभागातील ही आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
नगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीमध्ये १००० मिमी व्यासाची लोखंडी पाईपलाईन बदलण्याच्या कामाचे ३१ कोटी ५७ लाख ११ हजार ९९५ रुपयांचे टेंडर ठेकेदाराला देण्यात आले होते. या कामाच्या बदल्यात एकूण टेंडर रकमेच्या ५ टक्के रक्कम सहायक अभियंता किशोर गायकवाड व तत्कालीन उपभियंता गणेश वाघ यांनी लाचेच्या रुपाने मागणी केली होती. त्यानुसार ठेकेदाराकडून १ कोटी ५७ लाख ८५ हजार ९९५ रुपयांची मागणी केली.
काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने हे काम करण्यासाठी जमा केलेली ९४ लाख ७१ हजार ५०० रुपये सुरक्षा ठेव रक्कम व अंतिम देयक १४ लाख, ४१ हजार ७४९ रुपये अशी २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रुपये कार्यालयाकडून मिळावेत म्हणून फाईल सादर केली होती.
ही रक्कम देण्यापूर्वी सहायक अभियंता किशोर गायकवाड याने सध्या धुळे येथे कार्यकारी अभियंता असलेले व तत्कालीन सहायक अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेच्या सह्या करून देण्याच्या मोबदल्यात व आधी ठरलेल्या रकमेतून बक्षिस म्हणून एक कोटी रुपये लाचेची मागणी केली. यामुळे संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधकच्या नाशिक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या नेतृत्वाखाली सापळा पथक नेमण्यात आले.
तक्रारदाराकडून एक कोटींची लाच घेताना किशोर गायकवाड व गणेश चव्हाण या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या सापळा पथकात पोलिस नाईक प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण यांचा समावेश होता.