नागपूर (Nagpur) : कोरोना (Corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणाऐवजी शहराबाहेर घर खरेदीला पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहराच्या बाहेर डेव्हलपर्सने मोठमोठे टॉवर उभारले असले तरी बांधकाम खर्च आणि साहित्याचे दर चाळीस टक्क्यांनी वाढल्याने सुमारे पाच हजार फ्लॅट पडून आहेत.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष राजेंद्र आठवले यांनी ही माहिती दिली. कोरोना महामारीची पार्श्वभूमी घरे खरेदीची पद्धत बदलत आहे. कारण सध्या लोक आरोग्य सुरक्षितेतला पसंती देत आहेत. त्यामुळे या वर्षात जास्तीत जास्त घरांची खरेदी शहरापेक्षा ग्रामीण भागात होताना दिसते आहे. तसेच आता ग्राहक ई-स्कूलिंग, घरातून काम आणि सुरक्षेच्यादृष्टीने घर विकत घेत आहेत. अशा परिस्थितीत विकासक घर खरेदीदारांची मागणी लक्षात घेऊन ग्रामीण भागात घरांची उभारणी करत आहेत.
बांधकाम क्षेत्रात सध्या बरे दिवस आलेले आहेत. मात्र, वाढलेल्या दरवाढीचा फटका बसू लागला आहे. शहर आणि आजूबाजूच्या परिसरात पाच हजारपेक्षा अधिक फ्लॅट विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर वर्धा रोड, दाभा, बेसा, घोगली, नरसाळा, पारडी, लाव्हा, जयताळा आदी शहराच्या बाहेरच्या भागांत घरांची विक्री वाढताना दिसते आहे. सामान्य ग्राहकाला स्वस्त दरात चांगल्या दर्जाचे घर हवे असते.
कोरोनानंतर कच्चा मालाच्या दरात वाढ झाल्याने बांधकाम खर्चात वाढ झाली आहे. बांधकाम खर्च चाळीस टक्क्यांनी वाढला आहे. घरे तयार आहेत, पण वाढलेल्या किमतीमुळे सध्या मागणी घटली आहे. जीएसटी, कच्च्या मालाच्या वाढणाऱ्या किमतीवर नियंत्रण नसणे, यामुळे दर वाढले आहेत. महागडी घरे घेण्याकडे लोकांचा कल नाही, असे आठवले यांनी सांगितले.