नागपूर (Nagpur) : आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक झाल्यानंतर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर 44 कोटी खर्च करून तीन मजली मल्टिपरपज इनडोअर स्टेडियम बांधण्यात येणार आहे. यासाठी जागा निश्चित झाली असून, शासनाकडून 44 कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या खेळाडूंच्या प्रगतीला आणखी गती मिळणार आहे.
नागपूरसह विदर्भातील खेळाडूंचा विकास व्हावा, या उद्देशाने विद्यापीठाच्या रविनगरस्थित मैदानावर सर्व सुविधांयुक्त तीन मजली मल्टिपरपज इनडोअर स्टेडियम बांधण्यात येणार आहे. स्टेडियमसाठी सुभेदार सभागृहाजवळची जागा निश्चित करण्यात आली असून, राज्य शासनातर्फे 44.44 कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापैकी 20 कोटी रुपये मिळाले आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात बांधकामाला सुरवात होणार आहे. स्टेडियम दोन वर्षांत अर्थात 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. शताब्दी वर्षानिमित्त नागपूर विद्यापीठाने स्थानिक अॅथलिट्सला सिंथेटिक ट्रॅकची अविस्मरणीय भेट दिली. अन्य खेळांसाठीही दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. इनडोअर स्टेडियम त्याचाच एक भाग आहे.
या प्रस्तावित बांधकामाला गेल्या मार्चमध्ये शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर इनडोअर स्टेडियमचा मार्ग मोकळा झाला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे इनडोअर स्टेडियमचे बांधकाम करण्यात येणार असून, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात स्टेडियमच्या नकाशाला अंतिम मंजुरी व टेंडर प्रक्रिया होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्षात स्टेडियमच्या कामाला सुरवात होणार असल्याचे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी सांगितले.
असे राहील इनडोअर स्टेडियम
3 मजले असलेले इनडोअर स्टेडियम एअरकुल्ड राहणार असून, यात वूडन कोर्टची व्यवस्था राहणार आहे. याशिवाय स्टेडियममध्ये तळमजल्यावर बास्केटबॉल, पहिल्या माळ्यावर हॅण्डबॉलसह मूव्हेबल प्रेक्षक गॅलरी राहणार आहे. तर तिसऱ्या मजल्यावर बॅडमिंटन, टेबलटेनिस, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती, मुष्टियुद्ध, योगासन, स्वॅशसह विविध खेळांचा सराव व स्पर्धा घेण्याची व्यवस्था राहणार आहे. तसेच कॉन्फरन्स हॉल, मिटिंग हॉल, जिम, चेंजिंग रूम, प्रसाधनगृह व वेटिंग रूमचीही सुविधा राहणार आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यापीठाच्या मैदानावर खेळाडूंसाठी सर्व सुविधायुक्त चांगले मल्टिपरपज इनडोअर स्टेडियम असावे, असा विचार पुढे आल्यानंतर आम्ही तयारीला लागलो. शासनाकडून हिरवी झेंडी व निधी मंजूर झाल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे खेळाडूंसह क्रीडा क्षेत्राचाही सर्वांगीण विकास होणार आहे. अशी माहिती डॉ. शरद सूर्यवंशी, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, नागपूर विद्यापीठ यांनी दिली.