नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील ऐतिहासिक तलावांची दुर्दशा होत असून, यात भोसलेकालीन सक्करदरा तलावही अपवाद नाही. महापालिकेने या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू केले. त्यावर साडेतीन कोटींचा खर्च केला. परंतु राज्य सरकारकडून निधी न मिळाल्याने सौंदर्यीकरण पुढे नेण्यासाठी वेगळा पर्याय शोधण्याऐवजी कामच बंद केले. परिणामी परिसरातील कचरा तलावात टाकण्यात येत असल्याने साडेतीन कोटी पाण्यात गेल्याचे चित्र आहे. (Nagpur Sakkardara Lake)
विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून काम बंद असून, पुढे या कामाची किंमत वाढणार असल्याने कंत्राटदार कंपनी पुढे काम सुरू करणार की नाही, याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तलावाचे पुढे काय होणार? अशी चिंता परिसरातील नागरिक करीत आहेत.
दक्षिण नागपुरातील संजय गांधीनगर तलाव महापालिकेच्या उदासिनतेमुळे नष्ट झाला. आता दक्षिण नागपुरात एकमेव सक्करदरा तलाव असून, नागरिकांसाठी एकमेव पर्यटन तसेच विरंगुळ्याचा आधार आहे. परंतु गेल्या एक ते दीड वर्षांपासून या जुन्या व ऐतिहासिक तलावाचे काम रखडले आहे. राज्य सरकारने या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर केला होता. महापालिकेने या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी १० कोटींचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठवला होता.
या तलावाच्या कामासाठी ८ कोटी ३५ लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात आले होते. मनपातर्फे लहान मुलांसाठी खेळण्याचे मैदान, अँम्पी थिएटर, फूड कोर्ट, उद्यानाचा विकास आणि तलावाचा दुसरीकडे असलेल्या जागेवर उद्यानाच्या विकासाचे काम सुरू झाले. तलावाभोवताल संरक्षक भिंत उभी करण्याचे, तलावाचे खोलीकरणाचे काम सुरूही झाले. यावर साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु राज्य सरकारने पुढे निधी न दिल्याने या तलावाचे काम रखडले.
महापालिकेनेही पैसा होता तोपर्यंत काम केले. आता पुढे या तलावाचे काय होणार, ही चिंता सामान्य नागरिकांना असली तरी महापालिका प्रशासनाने मात्र निधीअभावी हात वर केले आहेत. दीड वर्षांपासून तलावाचे काम रखडले. त्यामुळे झालेले कामही व्यर्थ जात आहे. आता तर परिसरातील दुकानदार, नागरिकही तलावाच्या किनाऱ्यावर कचरा टाकत असल्याने दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य तलावात दिसून येत आहे. त्यामुळे साडेतीन कोटी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र आहे.