नाशिक (Nashik) : नाशिकहून विमानसेवा सुरूच राहील. केंद्रीय विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनीही उडान योजना सुरू राहावी याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. यामुळे नाशिकची विमानसेवा बंद पडणार असल्याची चर्चा चुकीची आहे, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिक विमानतळ दुरुस्तीसाठी बंद राहणार, अलायन्स कंपनीने सेवा बंद केली आदींमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा त्यांनी पत्रकार परिषदेत प्रयत्न केला. पण उडान योजना संपल्यानंतर संबंधित कंपनीला सेवा देणे परवडत नसल्यास काय मार्ग काढणार, याबाबत त्या स्पष्ट उत्तर देऊ शकल्या नाही. तसेच विमान उड्डाण मंत्रालय याबाबत धोरणात्मक निर्णय घेईल, असे सांगितले.
नाशिक (ओझर) विमानतळ येथून स्पाइसजेट व अलायन्स या दोन विमान कंपन्या पुणे, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, पुद्दुचेरी, तिरुपती या ठिकाणी विमासेवा पुरवतात. सध्या स्पाइस जेट विमानसेवा सुरू असून अलायन्सने सेवा बंद केली आहे. उडान योजनेची तीन वर्षांची मुदत संपल्यानंतर सेवा परवडत नसल्याचे कारण अलायन्स कंपनीने दिले आहे.
अलायन्सने सेवा बंद केल्यानंतर नाशिकच्या विमानसेवेवर परिणाम होऊन व्यावसायिक, उद्योजक यांची गैरसोय होऊ नये, यासाठी केंद्रीय विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. त्यांनी याबाबत पत्र पाठवून नाशिकहून विमासेवा सुरू ठेवण्याबाबत मंत्रालय काम करीत असल्याचे उत्तर दिले आहे. उडान योजनेबाबत निर्णय हा धोरणात्मक असल्याने तो केवळ नाशिकच्या बाबतीत नाही तर देशातील सर्व शहरांसाठी लागू राहणार आहे. यामुळे नाशिकची विमानसेवा बंद पडणार या चर्चेला काहीही अर्थ नाही. तसेच केंद्र सरकार यातून निश्चित मार्ग काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.