नाशिक (Nashik) : मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) मुंबई ते नाशिक (Mumbai-Nashik) दरम्यान पावसामुळे प्रचंड खड्डे (Potholes) पडले आहेत. या 200 किलोमीटर अंतरासाठी वाहन चालकांना पाच तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ही बाब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली. यावर पुढील आठ दिवसांत खड्डे बुजवले जातील, असे अश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भुजबळ यांना दिले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गाची चाळणी झाल्यामुळे मुंबई नाशिक हा प्रवास अत्यंत खडतर झाला आहे. नाशिकहून मुंबईला खासगी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच बसनेही नागरिक मोठ्याप्रमाणावर प्रवास करतात. मात्र, मागील दीड महिन्यांपासून या महामार्गाची अक्षरशः चाळणी झाली आहे. एरवी सकाळी लवकर निघाल्यानंतर अडीच तासांत मुंबईत पोहोचणाऱ्या वाहन चालकांना आता चार ते पाच तास लागत आहेत. महामार्गाच्या दोन्ही मार्गावर खड्डे पडले असूनही वाहन चालकांकडून ऑनलाईन पद्धतीने टोल वसूल केला जात असल्याने तक्रारही करता येते. नाशिकला पालकमंत्री नसल्यामुळे नाशिककरांचे प्रश्न मांडण्यातही अडचणी येत आहेत. मंत्रिपदावरून पायउतार झालेल्या छगन भुजबळ यांनी यापूर्वी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी नाशिकमधील प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी निभावली होती.
आताही नाशिकला पालकमंत्री नसून या महामार्गाबाबत शासनस्तवरून काहीही हालचाल दिसत नसल्याचे बघून भुजबळ यांनी आज नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (NHAI) प्रकल्प संचालकांसोबत नाशिक येथील कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी नॅशनल हायवे ॲथोरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत मुंबई-आग्रा महामार्गाची दुरवस्था नजरेस आणून देत, रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशा सूचना केल्या. यावेळी आठ दिवसांच्या आत नाशिक ते मुंबई दरम्यान महामार्गावरील सर्व खड्डे पूर्णपणे बुजवले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी भुजबळ यांना दिली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक बी. एस. साळुंखे उपस्थित होते.
चारचाकीला 135 रुपये टोल
नाशिकवरून मुंबईला जाईपर्यंत चारचाकी धारकांना एका बाजूने 135 रुपये टोल द्यावा लागत आहे. मोठ्या वाहनांचा टोल यापेक्षा काही पट अधिक आहे. मात्र, या रस्त्यावर आधीच घोटी, कसारा गाव, पडघे फाटा व टिटवाळा फाटा या चार ठिकाणी उड्डाण पुलांची कामे सुरू असून त्यासाठी बनवण्यात आलेले सर्व्हिस रोड निकृष्ट कामांमुळे पावसाने अधिक खराब झाले आहेत. तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून, चालकाच्या लक्षात न येऊन वाहन खड्ड्यात गेल्यास टायर कापले जातात. यामुळे वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे. खड्ड्यांबाबत ओरड झाल्यानंतर मधल्या काळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मुरूम व पेव्हरब्लॉक टाकून खड्डे बुजवले. मात्र, काही दिवसांतच खड्डे उघडे पडले आहेत. वाहन धारकांकडून ऑनलाईन पद्धतीने टोल वसुली केली जाते व त्याच्या बदल्यात खड्ड्यांचे रस्ते सुविधा दिली जाते, असे म्हणून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत, पण त्यांचे म्हणणे ऐकण्यास कोणी उपलब्ध नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.