नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्यातील 1384 गावांपैकी केवळ 496 गावांमध्ये ऑप्टिकल फायबर केबलद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट जोडणी पोहोचली आहे. गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत ऑप्टिकल फायबर केबल पसरवण्याचे काम सुरू असले तरी विशेषतः दुर्गम भाग यापासून वंचित असल्याचे दिसत आहे. पहिल्या टप्प्यातील भारत नेटचे काम बऱ्यापैकी झाले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील महानेट उद्दिष्ट गाठू शकत नसल्याचे दिसत आहे.
देशात हायवे प्रमाणेच आयवे म्हणजे इंटरनेट-वे द्वारे माहिती तंत्रज्ञान क्रांती घडवून आणण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात भारत नेटद्वारे ऑप्टिकल फायबर टाकण्यात आले. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील चांदवड, देवळा, दिंडोरी, कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड या तालुक्यांमध्ये ऑप्टिकल फायबर टाकण्याचे काम सुरू झाले. या सात तालुक्यांमधील 611 गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचे जाळे टाकण्यात आले. कोणत्याही गावात ऑप्टिकल फायबर जोडणी गेल्यानंतर प्रथम ग्रामपंचायत कार्यालयास जोडणी देण्यास प्राधान्य होते. त्यानंतर गावातील शाळा, सरकारी दवाखाना, पोस्ट ऑफिस, अंगणवाडी येथे इंटरनेट जोडणी देण्याचे सरकारने नियोजन केले. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 496 ग्रामपंचायत कार्यालयात इंटरनेट जोडणी दिली गेली आहे. इंटरनेट जोडणी 24 तास सुरू राहण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात 24 तास वीज पुरवठा सुरू असणे गरजेचे असते. मात्र, ग्रामपंचायत कार्यालयात 24 तास वीज पुरवठा सुरू ठेवणे शक्य नसल्याने या इंटरनेट जोडणीस अडथळा येत आहे. यामुळे 24 तास वीज पुरवठा शक्य असलेल्या ठिकाणी ही जोडणी करून तेथून ग्रामपंचायत कार्यालयास जोडले आहे.
दुसऱ्या टप्प्यात महानेटद्वारे ऑप्टिकल फायबर जोडणीचे काम सुरू आहे. मात्र, मागील दोन वर्षांमध्ये या महानेटने एकाही ग्रामपंचायतीला इंटरनेट जोडणी देण्यात आली नाही. महानेटच्या कार्यकक्षेत उर्वरित सिन्नर, येवला, इगतपुरी, पेठ, त्रिंबक, सुरगाणा, मालेगाव, बागलाण या आठ तालुक्यांचा समावेश होतो. या तालुक्यांमधील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणी नसल्याने तेथील आपले सेवा केंद्र, सीएससी केंद्र यांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. आदिवासी बहुल तालुक्यांमधील ग्राम पंचायतींना ऑनलाईन कामकाज करण्यात अडचणी येत आहेत. मात्र, याबाबत कोणीही शासकीय अधिकारी बोलण्यास तयार नाही. प्रत्येक कार्यालय त्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत असून, या ऑप्टिकल फायबरचे जाळे टाकण्याची जबाबदारी कोणाकडे आहे, याबाबतही कोणी बोलण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.
केंद्र सरकारने जाहीर केल्या नुसार 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत 568000 ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर द्वारे ब्रॉडबँडने जोडल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडल्या असतील, तर नाशिक जिल्ह्यातील ही संख्या एकूण ग्रामपंचायतींच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिक जिल्ह्यातील 1384 ग्रामपंचायतपैकी 496 ग्रामपंचायत कार्यालये ब्रॉडबँड ने जोडली असून उर्वरित 888 ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड जोडणीची प्रतीक्षा आहे.