नाशिक (Nashik) : राज्यात जिल्हयात टॅंकर सुरू असलेल्या गावांमधील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांचे काम तातडीने पूर्ण करा. येत्या उन्हाळ्यापर्यंत ही सर्व गावे टँकरमुक्त झाली पाहिजे, असे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.
राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्ह परिषदांचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या माध्यमातून सध्या अनुक्रमे २६ हजार कोटी व २७ हजार कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, सध्याचा या कामांचा वेग बघता ही कामे मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. त्यातच यंदा पावसाचे प्रमाण कमी असून संपूर्ण राज्यात टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. खरीप हातातून गेला असून खरीप पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत. या शिवाय राज्यात जवळपास साडेचारशे टँकरद्वारे अनेक गावे, वाड्या वस्त्यांना पाणी पुरवले जात आहे.
यावर्षी टंचाईची परिस्थिती असल्यामुळे पुढील उन्हाळ्यात या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणखी भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेली गावे, वाडया टँकरमुक्त व्हावे यादृष्टीने राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतीच मंत्रालयात त्यांच्या दालनात राज्यातील सर्वाधिक टंचाई असलेल्या दहा जिल्ह्यांमधील ग्रामीण पाणी पुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कार्यकारी अभियंत्यांकडून आढावा घेतला. या बैठकीस नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना व बुलढाणा या जिल्हयामधील अधिकारी उपस्थित होते. राज्यात सरासरीइतका पाऊस झालेला असला तरी, नाशिकसह ९ जिल्हयांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. या जिल्हयांमध्ये आतापासूनच टॅंकर सुरू आहेत. आगामी काळात टॅंकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रामुख्याने टॅंकर सुरू असलेल्या गावांमधील पाणी पुरवठा योजनांचे काम जलदगतीने पूर्ण करावी. जेणेकरून पुढील उन्हाळ्यात ही कामे टँकरमुक्त होतील, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
नाशिक जिल्ह्याची स्थिती
नाशिक जिल्हयात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून सद्यस्थितीत जिल्हयात ५८ टॅंकरद्वारे १५२ गावे व वाडयांना पाणी पुरवठा सुरू आहे. टॅंकर सुरू असलेल्या १५२ गावे व वाडयांमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ३८ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या ५६ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या ९४ गावांमधील पाणी पुरवठा योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्या सूचनेप्रमाणे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची ३८ कामे वेळेत पूर्ण केली जातील, अशी माहिती कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी दिली.