नाशिक (Nashik) : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात १२२२ पाणी पुरवठा योजना मंजूर आहेत. या योजनांपैकी ६०४ योजनांमधील विहिरींच्या उद्भवाची मे व जूनमध्ये भूजल शास्त्रज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर खोदण्यात आलेल्या विहिरींपैकी आणखी ४० विहिरी कोरड्या गेल्याने या योजनेतील आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास ९० विहिरी कोरड्या गेल्या आहेत. यामुळे या ठिकाणी उद्भव विहिरींची जागा बदलून नवीन विहिरी खोदण्याची वेळ आली.
या कोरड्या गेलेल्या विहिरींपैकी ६६ विहिरी या आदिवासी भागातील आहेत. या कोरड्या गेलेल्या विहिरींमध्ये आदिवासी भागातील सुरगाणा या एकमेव तालुक्यातील ३२ विहिरींचा समावेश आहे. आदिवासी भागातील भूरचनेनुसार तेथे कठीण खडक असल्याने भूगर्भात पाण्याचे झरे नसण्याची शक्यता अधिक असतानाही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तेथे शाश्वतस्त्रोतांवर आधारित पाणी पुरवठा योजना तयार करण्याऐवजी विहिरींचा पर्याय निवडल्याचा फटका जलजीवन मिशनमधील योजनांना बसत आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १४१० कोटींच्या १२२२ योजनांना मंजुरी दिली असून त्यातील ६०४ योजनांच्या विहिरींची कामे एप्रिलपर्यंत पूर्ण झाली. या ६०४ विहिरींच्या उद्भवाची चाचणी मे व जूनमध्ये करण्यात आली. त्यावेळी ५० विहिरी कोरड्या गेल्या होत्या. त्यानंतर पुढे पावसाळा संपल्यानंतर आणखी विहिरींची कामे पूर्ण झाली असून त्यापैकी आणखी ४० विहिरी कोरड्या निघाल्या आहेत. यामुळे आतापर्यंत जवळपास ९० पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या गेल्याने तेथे नवीन विहिरी खोदण्यास ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने परवानगी दिल आहे.
पाणी पुरवठा योजनेत एका विहिरीला तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार साधारणपणे चार ते पाच रुपये खर्च येतो. उद्भव तपासणीत ती विहिर उत्तीर्ण झाल्यानंतर विहिरीच्या कठड्यांचे बांधकाम केले जाते. यामुळे एका योजनेवरील विहिरीस साधारणपणे दहा लाख रुपये खर्च येत असतो. यामुळे या ९० पाणी पुरवठा योजनांसाठी नवीन विहिरी खोदण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. उद्भव विहिरी खोदण्यापूर्वी भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाणी उपलब्ध असल्याचा दाखला दिला जातो. मात्र, आदिवासी भागात तसेच कायम दुष्काळी भागात प्रती व्यक्ती ५५ लिटर पाणी उपलब्ध होऊ शकेल, इतके पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे दाखले भूजल सर्वेक्षण विभागाने ठेकेदारांना वाटले आहेत. त्यामुळे कोरड्या विहिरींचे प्रमाण वाढत असल्याचे बोलले जात आहे. भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी कार्यालयात बसून दाखले देत असल्यामुळे सरकारने जवळपास चार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरड्या विहिरींपैकी सर्वाधिक विहिरी या प्रामुख्याने सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांमधील आहेत. सुरगाण्यात ३२ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात ११ विहिरी कोरड्या गेल्या आहेत. या विहिरींची उद्भव चाचणी मेमध्ये घेतली जाते. आतापर्यंत केवळ ६०४ विहिरींची उद्भव चाचणी झालेली आहे. त्यानंतर खोदलेल्या विहिरींची अद्याप उद्भव चाचणी झालेली नसल्याने येत्या मेपर्यंत या नापास विहिरींची संख्या आणखी वाढणार आहे. मधल्या काळातील विहिरींना पाणीच न लागल्याने त्या ठिकाणी नवीन विहिरी खोदण्याची परवानगी दिली असून अद्याप त्यांची उद्भव चाचणी होणे बाकी असल्याने या विहिरींची संख्या आणखी वाढणार असल्याचे सांगितले आहे.
तालुका कोरड्या विहिरी
निफाड : ३
सिन्नर : ३
बागलाण : २
कळवण : ७
चांदवड : ४
देवळा : १
इगतपुरी : २
नाशिक : ३
पेठ : ५
सुरगाणा : ३२
मालेगाव : ३
दिंडोरी : ६
त्र्यंबकेश्वर : ११
नांदगाव : ४