UAE सरकारचा नाशिक विमानतळाबाबत महत्त्वाचा निर्णय; आता...

मालवाहतुकीला मिळणार चालना
Nashik Airport Ozar
Nashik Airport OzarTendernama
Published on

नाशिक (Nashik) : संयुक्त अरब अमिरातीतील (यूएइ) शारजाहच्या विमानतळ प्राधिकरणाने विस्तारीकरणाच्या योजनेत ह्यूस्टन (अमेरिका), किगाली (रवांडा) यांच्या बरोबरीने कार्गो वाहतुकीसाठी नाशिकच्या ओझर विमानतळाचा समावेश केला आहे. 'शारजाह' च्या या कृतीमुळे आगामी काळात नाशिक विमानतळावरून मोठ्याप्रमाणावर वस्तूंची विशेषत: कृषीमालाच्या निर्यातीला चालना मिळू शकणार आहे. यापूर्वी यूएईने नाशिक जिल्ह्यात फूडहब उभारण्याची घोषणा दोन वर्षापूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमिवर नाशिक विमानतळाचा मालवाहतुकीसाठी समावेश केल्याने भविष्यात ओझर विमानतळाचे महत्त्व वाढणार आहे.

Nashik Airport Ozar
Exclusive: आस्तिककुमार पाण्डेय कुणाच्या दबावाला बळी पडले?

नाशिक येथे ओझर विमानतळावर आंतरराष्ट्रीय सुविधांची उपलब्धता, धार्मिक स्थळांसाठी मध्यवर्ती ठिकाण आदी अनेक कारणांनी नाशिकचे ओझर विमानतळ महत्त्वाचे मानले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून त्याची उपेक्षा सुरू आहे. या विमानतळावरील काही सेवा बंद पडल्या असून 'इंडिगो'चे मार्चपासून आगमन झाल्याने काही प्रमाणात सेवेत सुधारणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुबईतील शारजाह विमानतळ प्राधिकरणाने मालवाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या विमानतळांमध्ये नाशिक विमानतळाचा समावेश केला आहे. शारजाह हे जगातील सर्वांत व्यग्र विमानतळांपैकी एक असून तेथील विमानतळ प्राधिकरणाने भविष्यात जगातील काही शहरांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यात प्रवासी वाहतुकीसाठी सहा शहरांचा, तर मालवाहतुकीसाठी तीन शहरांचा समावेश करण्यात आला.

Nashik Airport Ozar
PM नरेंद्र मोदींच्या 'या' योजनेला कोणी लावला 1 हजार कोटींचा चुना?

प्रवासी वाहतुकीसाठीच्या शहरांमध्ये क्वालालम्पुर (मलेशिया), उफा समेरा (रशिया), लार (इराण), इंदूर (भारत) व बँकॉक (थायलंड) यांचा समावेश केला असून मालवाहतुकीसाठीच्या शहरांमध्ये ह्यूस्टन (अमेरिका), किगाली (रवांडा), व नाशिक (भारत) यांचा समावेश आहे. यूएईने यापूर्वी फूडहब उभारण्यासाठी ५० हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केलेली आहे. त्यात शेतमालाची निर्यात,शेतमाल प्रक्रिया, शेतमाल पॅकिंग आदी सुविधा उभारल्या जाणार असल्याचे त्यावेळी नमूद केले होते. त्या घोषणेचा विचार केल्यास भविष्यात नाशिकमध्ये फूडहबसाठी यूएई सरकार गुंतवणूक करणार असून त्यासाठीच येथील विमानतळ त्यांच्यासाठी मालवाहतुकीसाठी महत्वाचे आहे. त्याप्रमाणे विद्यमान स्थितीतही नाशिक येथून मोठ्याप्रमाणावर शेतमालाची निर्यात दुबईला केली जाते. ओझर विमानतळापासून जवळच असलेल्या निफाड कारखाना परिसरात मल्टी मॉडेल हब अर्थात ड्रायपोर्ट उभारणीचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे यूएईमधील शारजाह विमान प्राधिकरणने घेतलेला निर्णय महत्वाचा मानला जात आहे. या घोषणेमुळे भविष्यात शारजा व नाशिक यांच्यातील 'कनेक्ट' वाढून नाशिकमध्ये कृषी, वाइन, औषधांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून, येथून निर्यातीला मोठा वाव आहे. यामुळे मालवाहतुकीबाबत नाशिकचे विमानतळ महत्वपूर्ण ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com