नाशिक (Nashik) : जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने योजनांचे आराखडे तयार करताना केलेल्या अनियमितता आता समोर येऊ लागल्या आहेत.
सिन्नर तालुक्यातील घोटेवाडी या एकाच ग्रामपंचायतीत घोटेवाडी नळ पाणी पुरवठा योजना व आशापुरी (घोटेवाडी ) या दोन पाणी पुरवठा योजना मंजूर करून दोन्ही योजनांची कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे दोन्ही योजनांसाठी एकच उद्भव विहिर वापरली जाणार असून एका योजनेतून गावातील सर्व वाड्या-वस्त्या व गावठाणातील सर्व घरांना पाणी पुरवले जाणार असू असून दुसऱ्या योजनेत केवळ जलवाहिनी व पाण्याची टाकी बांधली जात आहे. या टाकीतून एकही नळजोडनी आराखड्यात मंजूर केलेली नाही. यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ही योजना कोणासाठी मंजूर केली, असा प्रश्न यामीमित्ताने उपस्थित होत आहे.
सिन्नर तालुक्यातील घोटेवाडी ग्रामपंचायतीची लोकसंख्या साधारण १२०० आहे. या गावासाठी जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार करताना दोन जलकुंभ, उद्भव विहीर व जलवाहिन्या यांचा समावेश केला आहे. गावाच्या पुढील २५ वर्षांच्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन अनुक्रमे ६० हजार व ४० हजार लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ आराखड्यात मंजूर केले आहेत. मात्र, जलजीवन मिशनच्या निकषानुसार गावाची पाणी पुरवठा योजनेच्या आराखड्याची रक्कम गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक होत होती. यामुळे या योजनेला प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषद स्तरावर देण्यात अडचणी होत्या. यामुळे मंत्रालयातून या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यासाठी प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात आला. नेमके त्याच काळात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घोटेवाडी याच गावात आशापुरी (घोटेवाडी) ही एक जलकुंभ व त्यासाठी जलवाहिनी यांचा समावेश असलेली ८५ लाख रुपयांची दुसरी योजना मंजूर केली.
या योजनेतून ५० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ मंजूर केला असून एका टेकडीच्या पोटाशी तो उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे या जलकुंभाच्या एक किलोमीटर परिघात एकही घर नाही. त्यामुळे या जलकुंभातून पाणी जाण्यासाठी जलवाहिन्या प्रस्तावित केलेल्या नाहीत. यामुळे या ८५ लाखांच्या दुसऱ्या पाणी पाणी पुरवठा योजनेचा हेतु काय आहे? ही योजना कोणी मंजूर केली? आराखडे कोणी तयार केले व त्या आराखड्याला मंजुरी कोणी दिली, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणत्याही योजनेला प्रशासकीय मान्यता देताना ग्रामपंचायतीकडून कागदपत्र घेऊन ते प्रस्तावासोबत जोडले जातात. मात्र, या नवीन योजनेसाठी जुन्याच योजनेसाठी दिलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडल्या असल्याचे समजते. विशेष म्हणजे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे त्या योजनेला प्रशासकीय मान्यता दिल्याचे सांगितले जात आहे.
योजनेच्या हेतुला हरताळ
जलजीवन मिशन ही योजना केंद्र सरकारने प्रत्येक घरापर्यंत नळाने शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या जाहीर केली आहे. त्यानुसार घोटेवाडी गावाला एक कोटी ९७ लाख रुपयांची योजना प्रस्तावित केली. त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने गावाबाहेरील देवस्थानसाठी ८५ लाख रुपयांची योजना प्रस्तावित केली. या दुसऱ्या योजनेच्या जलकुंभातून एकाही कुटुंबाला पाणी मिळणार नाही, तरी एवढा मोठा निधी खर्च करणे हा या योजनेच्या मूळ हेतुच्या विसंगत आहे. यामुळे ही योजना मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होत आहे.
आशापुरी देवस्थान हे संगमनेर तालुक्यात असले तरी त्याची यात्रा टेकडीच्या पायथ्याशी घोटेवाडी शिवारात भरते. यामुळे तेथे यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी जलजीवन मिशन मधून योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचा जलकुंभ घोटेवाडी शिवारात आहे.
- संदीप सोनवणे, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, नाशिक