नाशिक (Nashik) : नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात उभारण्यात आलेल्या निळवंडे धरणाचे रब्बी हंगामातील सिंचनाचे आवर्तन अर्ध्यातच बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर (Mumbai Nagpur Samruddhi Expressway) तासभर रस्तारोको आंदोलन केले. यामुळे समृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान जलसंपदा विभागाचे अधिकारी व शेतकरी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सध्या नागपूर ते इगतपुरी दरम्यान वाहतुकीसाठी खुला असून, त्यावर पहिल्यांदाच रस्तारोको झाल्याने वेगवान वाहतुकीसाठी बांधण्यात आलेला समृद्धी महामार्गाचीही रस्तारोकोपासून सुटका नसल्याचे समोर आले आहे.
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात ८.३२ टीएमसी क्षमतेचे निळवंडे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या सात तालुक्यांचा समावेश आहे. या धरणाच्या कामास प्रारंभ झाल्यानंतर ५३ वर्षांनी या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कालव्यांचे उद्घाटन झाले.
सिन्नर तालुक्यातील देवकौठे, पाथरे बुद्रूक, पाथरे खुर्द, वारेगाव मलढोण, सायाळे या सहा गांवामधील सुमारे २६१२ हेक्टर क्षेत्राला निळवंडे धरणातून सिंचन होणे अपेक्षित आहे. मात्र, यावर्षी पावसाळ्यात पूरपाणी सोडले असतानाही सिन्नर तालुक्यातील गावांना पाणी जाऊ दिले नाही. तसेच आता रब्बीच्या आवर्तनातही सर्व गावांना सिंचनासाठी पुरेसे पाणी दिले नाही.
जलसंपदा विभागाने सिन्नर तालुक्यातील गावांसाठी नदी मार्गाने पाणी सोडले होते. मात्र हे आवर्तन पाथरे, वारेगावपर्यंत येणे अपेक्षित असताना धरणाचे आवर्तन बंद करण्यात आले. यामुळे पाथरे व वारेगावला पाणी मिळू शकले नाही. धरणामध्ये एक टीएमसी पाणी शिल्लक असताना आवर्तन बंद केल्याने शेतरी संतप्त झाले आहेत.
यावर्षी सिन्नर तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून निळवंडेच्या पाण्यामुळे किमान पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा होती. मात्र, आवर्तन बंद करण्यात आल्याने नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील सायाळे शिवारात शेकडोच्या संख्येने एकत्र येत शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावरची वाहतूक रोखून धरली.
जवळपास दीडशे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळी सव्वा अकरा ते सव्वा बारा दरम्यान रास्ता रोको करण्यात आला. नाशिक ग्रामीण पोलिस दलाकडून वावी पोलिसांच्या मदतीला सिन्नर आणि एमआयडीसी येथून पोलीस कुमक पाठवली होती. दरम्यान निळवंडे प्रकल्पाचे व जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलन स्थळी आल्यावर झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.