नाशिक (Nashik) : Nashik Municipal Corporation नाशिक शहरात गेल्या तीन वर्षांत उभारलेल्या 600 कोटींच्या रस्त्यांची पावसामुळे अक्षरशा चाळणी झाली आहे. यामुळे महापालिकेत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठेकेदारांची झाडाझडती घेतली. मात्र, ठेकेदारांनी हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याने अखेरीस अंतिम नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त न झाल्यास या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
नाशिक शहरात गेल्या दोन अडीच वर्षांपासून रस्त्यांवर झालेला खर्च व सततच्या पावसामुळे रस्त्यांची झालेली चाळण लक्षात घेत शहरातील रस्त्यांच्या नावलौकिकास गालबोट लागले आहे. दरम्यान खड्ड्यांबाबत नागरिकांचा रोष वाढत असताना लाजेकाजे का होईना बांधकाम विभागाकडून खड्डेदार ठेकेदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहे. नोटीसा बजावल्यानंतर देखील नागरिकांचा रोष काही कमी होत नाही.
ठेकेदारांची झाडाझडती
रस्त्यांवरील खड्ड्यांवरून यापूर्वी 14 ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यातील काही ठेकेदारांची बैठक आयुक्त पुलकुंडवार यांनी घेतली. खड्डेदार ठेकेदारांवर कठोर कारवाईच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या. यांना अंतिम नोटीस देऊन त्यानंतर सुधारणा न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती
गणेशोत्सवाला पुढील आठवड्यापासून प्रारंभ होत आहे. त्यापूर्वी तीन वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदारांनी रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, रस्त्यांवरील खड्डे मोजून ते बुजवावेत व त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. गुणवत्ता विभागाने जागेवर जाऊन पाहणी करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
'राष्ट्रवादी' आक्रमक
दरम्यान शहरातील जुन्या रस्त्यांवर खड्डे नसून नवीन रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.