नाशिक (Nashik) : येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची (Sahyadri Farmers Producer Company Limited) १०० टक्के मालकी असलेल्या सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लि. या कंपनीमध्ये ३१० कोटी रुपयांची थेट परकिय गुंतवणूक युरोपातील गुंतवणूकदारांच्या समूहाने केली आहे. इंकोफिन (Incofin), कोरीस (Korys), एफएमओ (FMO) आणि प्रोपार्को (Proparco) यांचा या गुंतवणुकदारांमध्ये समावेश आहे. या गुंतवणुकीतून पॅक हाऊस व कचऱ्यापासून वीज निर्मिती हे प्रकल्प साकारले जाणार आहेत.
छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत (एंड-टू-एंड) सहाय्य प्रदान करणारे सह्याद्री फार्म्स हे ग्रामिण उद्योजकतेचे उत्तम उदाहरण आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे 2010 मध्ये दहा शेतकऱ्यांच्या छोट्या गटाने एकत्र येत द्राक्षे युरोपात निर्यात केली. हाच छोट्या शेतकऱ्यांचा समूह आज सह्याद्री फार्म्सच्या रुपाने भारतातील आघाडीची फळे आणि भाजीपाला निर्यात आणि प्रक्रिया करणारी कंपनी बनली आहे. सह्याद्री फार्म्सचा नऊ पिके, 18 हजार शेतकरी आणि 31 हजार एकरहून अधिक क्षेत्र असा विस्तार झाला आहे.
संलग्न शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीच्या पिकांची निवड करण्यापासून पीक पद्धतीचे मार्गदर्शन, शेतकरी वापरत असलेल्या कृषी निविष्ठा (इनपूट्स), पीक काढणी आणि विक्री या सर्व टप्प्यांवर सह्याद्री फार्म्सची साथ असते. या प्रक्रियेत सह्याद्री फार्म्सने एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च-उत्पन्न देणार्या पिकांच्या जाती, बियाणे, खते, कीडनाशके आदी कृषी निविष्ठा, प्रत्यक्ष (रिअल टाइम) हवामानाची माहिती आणि कृषिमाल बाजारपेठेत नेण्यापर्यंतची इत्थंभूत माहिती पुरविण्यात येते. सह्याद्री फार्म्समुळे छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक व सामाजिक परिवर्तन होत आहे.
कोरीस, एफएमओ, प्रोपार्को आणि इंकोफिन यांच्याकडून सह्याद्री फार्म्समध्ये केली जाणारी भांडवली गुंतवणूक ही शेतकऱ्यांच्या कंपनीची आणखी वाढ करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. सह्याद्री फार्म्सला प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला उत्पादनांची आपली क्षमता वृद्धींगत करायची आहे, तसेच प्रक्रियापश्चात कचऱ्यापासून वीज निर्माण करण्यासाठी बायोमास प्लांट आणि पॅकहाऊससारख्या पायाभूत सुविधा वाढवायच्या आहेत. त्यासाठी या गुंतवणुकीचा उपयोग केला जाईल.गुंतवणुकीच्या या प्रक्रियेत ‘अल्पेन कॅपिटल’ने सह्याद्री फार्म्ससाठी विशेष धोरणात्मक सल्लागार म्हणून काम केले.
शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना उद्योजकांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या विचारप्रवृत्त करणे ही सह्याद्री फार्म्सची मूळ संकल्पना आहे. प्रत्येक लहान आणि सीमान्त शेतकऱ्यांसाठी शेती फायदेशीर आणि व्यावहारिक व्यवसाय बनावा या उद्देशाने आम्ही एक शाश्वत, मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी सक्षम अशी संस्था विकसित करीत आहोत.
- विलास शिंदे, संस्थापक (शेतकरी) आणि व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स