नाशिक (Nashik) : नाशिक-पुणे (Nashik-Pune) महामार्गावरील मंचर व खेड येथील अडथळे दूर होण्याबरोबरच आता या मार्गावरून शिवाई या इलेक्ट्रिक बसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. सध्या नाशिक व पुणे आगारात नऊ शिवाई दाखल झाल्या आहेत. यामुळे इंधनामध्ये बचत होऊन प्रदूषण टाळण्याबरोबरच प्रवाशांना ४७५ रुपये तिकीटदरात पुणे ते नाशिक असा प्रवास करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व शिवशाही बस मालक यांच्यातील करार संपल्यामुळे एसटीने शिवशाही बससेवा बंद केली आहे. यामुळे नाशिकहुन पुणे येथे जाण्यास प्रवाशांची काहीशी अडचण झाली होती. त्यावर उपाय म्हणून शिवाई या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बससेवेकडे बघितले जात आहे. जवळपास वर्षापासून नाशिक पुणे मार्गावर इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठीची पूर्वतयारी केली जात आहे. नाशिक बसआगारात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून महामार्गावरही ही सुविधा करण्यात आली आहे.
सध्या नाशिक विभागाच्या ८ व पुणे विभागाच्या ८ अशा रोज १६ फेऱ्या होणार असल्याची माहिती एस.टीकडून देण्यात आली. इलेक्ट्रिक बसची या मार्गावरून यापूर्वीच चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाल्यानंतर आता नियमितपणे इलेक्ट्रिक बससेवा सुरू झाली आहे. नाशिक-पुणे मार्गासाठी पूर्ण तिकीट ४७५ रुपये असणार आहे. महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात या बसने प्रवास करता येणार आहे. शिवाई बस एकदा चार्जिंग केल्यानंतर २५० किलोमीटर धावते. नाशिक ते पुणे अंतर २१५ किलोमीटर असल्यामुळे ही बससेवा निर्विघ्नपणे एक फेरी पूर्ण करू शकणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ बस धावणार आहे. या बसेस पूर्णत: आरामदायी असून त्यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात वाहक ट्रेकिंग प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रायव्हर स्टेट्स मॉनिटरिंग सिस्टिम, हवा गुणवत्त फिल्टर या सुविधा आहेत.