नाशिक (Nashik) : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये धावणारी इलेक्ट्रिक बस 'शिवाई' लवकरच राज्य परिवहन मंडळाच्या नाशिक विभागातील रस्त्यांवरही दिसणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागासाठी एप्रिलमध्ये बारा शिवाई बस उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या कामकाजाचा आढावा शेखर चन्ने यांनी एन. डी. पटेल रोडवरील मध्यवर्ती कार्यालयात घेतला. यावेळी विभाग नियंत्रक अरुण सिया, वाहतूक नियंत्रक किरण भोसले यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. महामंडळाचा खर्च आणि उत्पन्न, अपघात स्थितीचा आढावा चन्ने यांनी घेतला. यावेळी चन्ने म्हणाले, की पुणे, अहमदनगर, मुंबईसह राज्यात काही जिल्ह्यांममध्ये शिवाई बसची सेवा उपलब्ध झाली आहे. या 'ई बस' सेवेला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे.
नाशिकमध्ये याबसच्या चार्जिंगसाठीचे स्टेशन तयार झाले आहेत. यामुळे नाशिक विभागासाठीही एप्रिलमध्ये शिवाईच्या बारा ई बस उपलब्ध होणार आहे. यामुळे नाशिक, पुणे व नाशिक मुंबई या मार्गावरून लवकरच ई बस धावताना दिसणार आहेत. यपूर्वी मुंबई, पुणे येथे ई बस सुरू झाल्या असताना नाशिकमध्ये ई चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे ई बस मिळण्यात अडचणी होत्या. आता चार्जिंग स्टेशन उभारल्यामुळे भविष्यात ई बसची संख्या वाढणार आहे.
महामंडळाने महिलांसाठी १७ मार्चपासून ५० टक्के सवलतीच्या दरात प्रवासाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या महिला सन्मान योजनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रवासी संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवा. प्रवाशांना चांगली सेवा मिळेल याची दक्षता घ्या, असे निर्देश चन्ने यांनी दिले. प्रवासी संख्या वाढत असताना आपल्याकडे बस उपलब्ध नाहीत अथवा बस नादुरुस्त आहेत, अशी परिस्थिती उद्भवायला नको, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. नाशिक विभागासाठी मागील महिन्यात ३० नवीन बस उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय आणखी नवीन बस उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.