नाशिक (Nashik) : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम) अंतर्गत नाशिक महापालिका शहरातील ११३ सार्वजनिक शौचालयांवर सौरऊर्जा पॅनल बसवणार आहे.
या सौरपॅनलच्या माध्यमातून प्रत्येकी एक ते तीन किलोवॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. हे सोलर पॅनल बसवण्यासाठी महासभेने एक कोटी ८२ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांसाठी सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन-कॅप) जाहीर केला आहे. त्यात २०२४ पर्यंत हवा प्रदूषण रोखणे व त्या माध्यमातून देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे नियोजन आहे. नाशिक शहरातही प्रदूषणाची पातळी घसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने नाशिक शहराचा देखील एन-कॅप योजनेत समावेश केला आहे.
वायुप्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला आतापर्यंत चाळीस कोटी रुपये अनुदान दिले आहे. महापालिकेन यापूर्वीच या अनुदानातून इलेक्ट्रिक बस खरेदीचा प्रस्ताव तयार करून त्याची टेंडर प्रक्रियाही सुरू केली आहे. त्याचप्रमाणे या निधीतून सौर वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या विद्युत विभागाने घेतला आहे. यानुसार शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांवर वीजनिर्मितीसाठी सौर पॅनल बसवण्यात येणार असून त्यातून तयार होणाऱ्या होणाऱ्या विजेचा वापर केला जाईल. नाशिक महापालिका हद्दीत ११३ सार्वजनिक शौचालये असून प्रत्येक ठिकाणी १.६१ लाख रुपये याप्रमाणे एक कोटी ८२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने विद्युत विभागाला प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या मान्यतेनंतर एक कोटी ८२ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महासभेने मंजूर दिली. या संदर्भातील टेंडर प्रक्रियादेखील जाहीर करण्यात आली असून लवकरच पॅनल बसविण्याचे काम सुरू होणार आहे.