नाशिक (Nashik) : नाशिक महापालिका प्रशासनाने (NMC) यंदाच्या आर्थिक वर्षात जमेच्या धरलेल्या बाजू कमकुवत ठरल्याने उत्पन्नात तब्बल साडेचारशे कोटी रुपयांची तूट आली आहे. मिळकती विकसित करणे, नगर रचनाच्या परवानग्या यामधून गृहित धरलेल्या २,२२७ कोटी रुपये उत्पन्नाच्या बाबतीत निराशा पदरी पडली. यामुळे महापालिकेचे उत्पन्न १८०० कोटींच्या आत येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. यामुळे आता सुधारित अंदाजपत्रक (Budget) सादर करताना विविध विभागांच्या खर्चाना कात्री लावण्याच्या सूचना लेखा विभागाने दिल्या आहेत.
महापालिका प्रशासनाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २२२७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. या अंदाजपत्रकात उत्पन्नाची बाजू ग्राह्य घरताना सर्वाधिक उत्पन्न जीएसटीच्या माध्यमातून मिळणार होते. त्यानुसार राज्य शासनाकडून नियमित मासिक हप्ता महापालिकेला प्राप्त झाला. या व्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर स्त्रोत पूर्णपणे कोलमडले आहेत. महापालिकेला १२ मिळकती विकसित करून त्यातून जवळपास २०० कोटी रुपये प्राप्त होतील, असा अंदाज होता. मात्र, हा बीओटी प्रकल्प रद्द झाला. नगररचना विभागातून जवळपास २५० कोटी रुपये मिळतील, असा अंदाज होता. मात्र बांधकामाच्या ऑनलाइन परवानग्यामुळे हा अंदाजही फसला.
घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून देखील उद्दिष्ट गाठता येणे अद्यापही शक्य दिसत नाही. विविध करांच्या माध्यमातून देखील फारसे उत्पन्न मिळत नाही. नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी या आर्थिक वर्षाच्या जमा व खर्चाचा आढावा घेत असताना विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार जवळपास साडेचारशे कोटी रुपयांची तूट दिसून आली आहे. त्यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक पूर्णपणे कोलमडले असून, यात सुधारणा करण्यास अजिबात वाव नाही. त्यामुळे बांधकामसह महत्त्वाच्या विभागांना त्यांच्या विकासकामांच्या खर्चाला कात्री लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
असे फसले अंदाज
महापालिकेला मालमत्ता कराच्या माध्यमातून १५१ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. प्रत्यक्षात ८० कोटी रुपये प्राप्त झाले. नगररचना विभागाकडून ३०२ कोटी रुपये अपेक्षित होते, मात्र आत्तापर्यंत १३५ कोटी रुपये प्राप्त झाले. पाणीपट्टीचे उद्दिष्ट ७५ कोटी रुपये होते. त्यापैकी आतापर्यंत फक्त ४१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मिळकत विभागाकडून २५४ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना २५ कोटी रुपये प्राप्त झाले. घरपट्टीचे १८९ कोटी रुपयांची उद्दिष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत ८० कोटी रुपये जमा झाले. जमेच्या एकत्रित बाजूंचा अंदाज घेता जवळपास ४५० कोटी रुपयांची तूट दिसून येत आहे.
अंदाजपत्रक घटणार
महापालिका प्रशासन आता २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करीत आहे. मागीलवर्षी २२२७ कोटी रुपयांचे अंदाज पत्रक तयार करताना गृहित धरलेल्या उत्पन्नाच्या बाबींमधून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करतानाही याबाबी वगळाव्या लागणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षाचे अंदाजपत्रक १९०० कोटी रुपयांच्या आसपास करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना लेखा विभागाला मोठी कसरत करावी लागणार आहे.