नाशिक (Nashik) : मुंबई - आग्रा महामार्गावरील मुंबई- नाशिक या प्रवासासाठी गोंदे ते पिंप्री सदो या २० किलोमीटरच्या टप्याचे सहापदरीकण करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मागील डिसेंबरमध्ये केली होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने काँक्रिटीकरणाच्या कामाचा ७५५ कोटींचा आराखडा तयार केला आहे.
गोंदे ते पिंप्रीसदो या २० किलोमीटर महामार्गाशी संलग्न दोन्ही बाजूस सर्व्हिसरोड प्रस्तावित करण्यात आल्याने रस्ता दहापदरी असणार आहे. सध्या या रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू असून येत्या जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फ (NHAI) प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.
नाशिक ते मुंबई दरम्यान प्रवासाचा वेळ कमी व्हावा या हेतूने गोंदे ते वडपे या सुमारे ९७ किलोमीटर अंतराचे सहा पदरीकरण आणि काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे. त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील वर्षी घोषणा केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात त्यातील गोंदे ते पिंप्री सदो या १९.७ किमी रस्त्याच्या कामाचा आराखडा निश्चित झाला आहे.
नाशिकहून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथील इंटरचेंज (आय.सी.) सर्वात सोयीचा आहे. सध्या नाशिकहून पिंप्री सदोपर्यंत जाण्यासाठी सुमारे ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. सध्याच्या मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा वाढता भार आणि डांबरी रस्त्याला दर पावसाळ्यात पडणारे खड्डे पाहता गोंदे ते पिंप्री सदो मार्गाचे सहापदरीकरण करताना या संपूर्ण टप्याचे काँक्रिटीकरणही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामध्ये महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे १७ किमीचे सर्व्हिसरोड, तीन रेल्वे ओव्हरब्रिज, पाच छोटे पूल यांसह अन्य सुविधांचा समावेश असेल. परिणामी, नाशिकहून निघाल्यावर अवघ्या २५ ते ३० मिनिटांत पिंप्री सदोपर्यंत पोहोचता येईल. टेंडरमधील अतिशर्तीनुसार हे काम अडीच वर्षांत पूर्ण करायचे आहे.
येत्या जानेवारी महिन्यात गोंदे ते पिंप्री सदो या मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. भूसंपादनाचा अडथळा नसल्याने विस्तारीकरण वेळेत पूर्ण करून वाहनधारकांना शक्य तेवढ्या लवकर रस्ता खुला केला जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संचालक भाऊसाहेब साळुंखे यांनी सांगितले.