नाशिक (Nashik) : माळेगाव (सिन्नर) औद्योगिक वसाहतीमध्ये एमआयडीसीच्या प्रादेशिक विभागाकडून ९ कोटी रुपये खर्चून केलेली रस्त्यांची कामे अत्यंत नित्कृष्ट दर्जाची आहेत.
पावसाळा सुरू होऊन अद्याप चांगला पाऊस पडण्याच्या आधीच या रस्त्यांची दुरवस्था झाल्याची तक्रार उद्योजकांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केली आहे. यावर प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी माळेगाव (सिन्नर), अक्राळे (दिंडोरी) येथील उद्योजकांनी तेथील पाणीप्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, घंटागाड्या, कचऱ्याची विल्हेवाट, पथदीपसह आदी प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आणि अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांज्जे यांनी दिली.
एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी कार्यालयाने नुकतीच जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी उद्योजकांनी माळेगाव औद्योगिक वसाहतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्याचा मुद्दा उपस्थित झाला. सध्या माळेगाव औद्यागिक वसाहतीमध्ये रोज १४ दशलक्ष लिटर (१४ एमएलडी) पाणी पुरवठा होत आहे. तो वाढवून २० दशलक्ष लिटर (२० एमएलडी) करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पाण्याचा दर्जा सुधारावा असा आग्रह उद्योजकांनी धरला. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दोन दोन दिवस पाणी पुरवठा बंद केला जातो. याबाबतही उदयोजकांनी तक्रार केली. यावर भविष्यात असा प्रकार होणार नाही, याची हमी अधिकाऱ्यांनी दिली.
माळेगाव एमआयडीसीमध्ये ९ कोटी रुपये खर्च करून अंतर्गत रस्त्यांची कामे केली आहेत. मात्र, ही कामे अत्यंत नित्कृष्ट दर्जाची असून पावसाळ्याच्या सुरवातीलाच त्यांची दुरवस्था झाल्याची बाब उद्योजकांनी नजरेस आणून दिली. यावेळी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. माळेगावची प्रवेशद्वार कमान, दिशादर्शक बोर्ड उभारण्याचे बैठकीत ठरले. पाणी बिल संकलन केंद्राचे वेळ वाढवून मिळावी. अनेकदा तेथे कर्मचारीच उपस्थित नसतात आदी तक्रारी उदयोजकांनी केल्या. यावेळी पाणीबील भरण्याची वेळ वेळ वाढवून देण्याचे व बील भरायला आलेल्या व्यक्तीस परत न पाठवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत दिंडोरी तालुक्यातील आक्रळे तळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वीज उपकेंद्र, फायर स्टेशन, ट्रक, टर्मिनस, सीईटीपी प्रकल्प आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.