नाशिक (Nashik) : कधीकाळी शहरातून पंचवटीत जाण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला रामसेतू धोकादायक झाला आहे. हा पूल कधीही पडू शकतो, यामुळे हा धोकादायक पूल पाडण्याची मागणी झाली. स्मार्ट सिटी कंपनीनेही मागणीप्रमाणे पूल पाडण्याची कार्यवाही सुरू केली. मात्र, स्थानिकांकडून पूल पाडण्यास विरोध झाल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा मध्यममार्ग शोधण्यात आला. या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये रामसेतूला जीवदान मिळाले आहे. त्यामुळे आता या पुलाची केवळ डागडुजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक शहरातून पंचवटीत जाण्यासाठी व पंचवटीतून शहरात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून साठच्या दशकात रामसेतू पूल उभारण्यात आला होता. कालौघात या पुलाने असंख्य पुरांसह तब्बल चार महापूरही अनुभवले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी या पुलाला समांतर पुलाची निर्मिती करण्यात येऊन जुन्या पुलाची डागडुजीही करण्यात आली. पुलाचा स्लॅब अनेक ठिकाणी निघून गेल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर स्लॅब निखळल्याने अनेक ठिकाणी हा पूल धोकादायक बनला आहे. हा पूल पूर्वी अतिशय अरुंद होता, सिंहस्थ कुंभमेळ्याच्यावेळी या पुलाच्या डागडुजीसह समांतर पुलाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून या पुलाचा ताबा रस्त्यावरील व्यावसायिकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे या पुलावरून वाहनांना बंदी असतानाही अनेक जण दुचाकीही चालवत आहेत.
व्यावसायिकांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना बांबू बांधून जागाही आरक्षित करून त्याठिकाणी प्लॅस्टिक लावल्याने पुलाला ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोहीम राबवूनही हे विक्रेते या ठिकाणाहून हलायला तयार नाहीत. त्यातच जुन्या व नवीन पुलाच्या मधोमध मोठे खड्डेही पडले आहेत. यामुळे धोकादायक रामसेतू पाडला जावा, अशी मागणी होत होती. त्याचीच दखल घेऊन स्मार्टसिटी कंपनीने या पुलाच्या जागी नवीन पूल प्रस्तावित करण्यात आला होता. त्यासाठी राज्य शासनाने निश्चित केलेल्या संस्थेकडे या पुलाबाबत स्ट्रक्चरल अहवालासाठी पाठपुरावा सुरू होता. या संस्थेकडून स्मार्टसिटीला नुकताच हा अहवाल प्राप्त झाला असून, आता नवीन पुलाऐवजी केवळ डागडुजी केली जाणार आहे, असे स्मार्ट सिटी कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.