मुंबई (Mumbai) : जालना ते जळगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गावर देशातील सर्वात मोठ्या बोगद्यातून रेल्वेमार्ग तयार केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे. यावर ७,१०६ कोटी रुपये खर्च होणार आहे. या रेल्वेमार्गाचे वैशिष्ट्य सांगताना रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा व वेरूळला हा रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे. यामुळे देश व विदेशातील पर्यटकांना या पर्यटनस्थळांना भेटी देणे सोईस्कर होणार आहे. या रेल्वे मार्गावर रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा तयार केला जाणार आहे. या बोगद्याची लांबी २३.५ किलोमीटर एवढी राहणार आहे. यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. या रेल्वेमार्गाने मराठवाड्यातील उद्योजकांना फायदा मिळणार असून जहाजांमध्ये माल नेण्यासाठी या रेल्वेचा उपयोग होऊ शकणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील जालना, औरंगाबाद व जळगाव ही जिल्हे रेल्वेने जोडले जाणार आहेत.
मुंबईसाठी २० हजार कोटी
मुंबईच्या रेल्वेच्या विकासासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती देऊन ते म्हणाले, मुंबईत दररोज ७५ लाख लोक लोकलने प्रवास करतात. पश्चिम व मध्य रेल्वेमार्ग अधिक प्रभावी करण्यासाठी रेल्वे १० प्रकल्प पूर्ण करणार आहे. देशातील १२८ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण अमृत रेल्वे योजनेअंतर्गत केले जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले.