नाशिक (Nashik) : अती पर्जन्याच्या भागामध्ये पावसाळ्यात रस्ते खचून वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रकार घडत असतात. पावसाळ्यात रस्ते वाहून जाऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 'सॉईल स्टॅबिलायझेशन' या तंत्रज्ञानाचा वापर करीत राज्यातील पहिलाच रस्ता इगतपुरी तालुक्यात उभारला जात आहे. पिंपळगाव मोर ते वासाळी या दोन गावांमधील १३.८ किलोमीटर रस्त्यासाठी आशियाई डेव्हलपमेंट बँकेच्या आर्थिक सहकार्याने ९८ कोटींचा रस्ता उभारला जात असून दोन वर्षांची मुदत असताना सहा महिन्यांत रस्त्याचे ५० टक्के काम पूर्ण झाले. वर्षभरात हा रस्ता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बांधकाम विभागाने ठेवले आहे.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. यामुळे या भागातील पारंपरिक रस्त्यांचा भराव वाहून जात असतो. त्यावर उपाय म्हणून बांधकाम विभागाने 'सॉईल स्टॅबिलायझेशन' तंत्रज्ञानाचा वापर करणे प्रस्तावित केले आहे. या रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने ९८.०८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. सॉईल स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञानामध्ये रस्त्यासाठी भराव उभारताना तो केवळ माती, मुरूम व दगडाचा वापर करण्याऐवजी त्यात काही प्रमाणात सिमेंट मिसळतात. यामुळे भरावी भक्कम होऊन पावसाळ्यामध्ये पाण्याचा लोंढा आला तरी पाणी रस्त्यावरून वाहून जाते, पण रस्ता भक्कमपणे तसाच राहतो. त्याचप्रमाणे सात मीटर रुंदीच्या या रस्त्याचे पूर्ण काँक्रिटीकरण केले जात आहे. या नवीन रस्त्यावर कडवा नदीवर व शुक्लतीर्थ या ठिकाणी दोन पूल उभारले आहेत. त्यांची उंची पूर्वीपेक्षा दोन मीटरने वाढवली आहे. या रस्त्याचे काम मागील डिसेंबरमध्ये सुरू झाले असून आतापर्यंत ५० टक्के काम झाले आहे. पुढच्या पाच-सहा महिन्यांमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाला विश्वास आहे. राज्यातील हा पहिलाच रस्ता असून त्याच्या यशस्वी चाचणीनंतर अतिपावसाच्या प्रदेशातील बहुतांश रस्त्यांवर सॉईल स्टॅबिलायझेशन या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
सॉईल स्टॅबिलायझेशन म्हणजे काय?
अति पावसाच्या प्रदेशात पावसाळ्यात उंचावरून जोराने वाहत येत असलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहून जाण्याचे प्रकार घडतात. पावसाळ्यात या रस्त्यांची दुरुस्ती करता येत नसल्यामुळे त्या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद होऊन त्या भागाचा संपर्क तुटतो व अत्यावश्यक सेवा पुरवणेही अवघड होते. यामुळे राज्य सरकारच्या आशियाई बँकेच्या सहाय्य्याने पावसाळ्यात वाहून जाणार नाहीत, असे रस्ते उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील या पहिल्या रस्त्यासाठी सॉईल स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यात रस्ते प्रामुख्याने सिमेंट कॉक्रिटचे बांधले जातात. या रस्त्यांसाठी केवळ माती-मुरूम टाकून भराव उभारण्याऐवजी त्यात काही प्रमाणात सिमेंट मिसळले जाते. त्यामुळे त्या भरावाची शक्ती वाढून तो जोराच्या पाण्याच्या लोंढ्यात वाहून जात नाही. तसेच रस्ता काँक्रिटचा असल्यामुळे अतिपावसामुळे त्यावर खड्डे पडत नाहीत.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या अतिपावसाच्या भागात सॉईल स्टॅबिलायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील पहिला उभारला जात आहे. हा रस्त्याचे काम मुदतीपूर्वी वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- उदय पालवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक
आशियाई बँकेच्या अर्थसहाय्यातून सॉईल स्टॅबिलायझेशन या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधल्या जात असलेल्या रस्त्याच्या कामाबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सामाजिक दायीत्वही निभावले जात आहे.यात परिसरातील शाळांमध्ये मुलींना स्वच्छतागृह उभारणे, नागरिकांसाठी आरोग्य शिबिर उभारणे तसेच रस्त्याच्या कडेला निवारा शेड उभारणे व तेथे स्वच्छतागृह बांधणे आदी कामे केली जात आहेत.
- अरुंधती शर्मी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक