Nashik News नाशिक : महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशनकडून प्रस्तावित नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग व्यवहार्य करण्यासाठी नुकतीच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाशिकरोड रेल्वेस्थानक येथे बैठक झाली.
या बैठकीत नाशिक-पुणे या सेमी हायस्मीड रेल्वेमार्गावरून शिर्डीसाठी २४ वंदेभारत व दोन इंटरसिटी गाड्या चालवण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत प्रामुख्याने हा रेल्वेमार्ग व्यवहार्य करण्याबाबत चर्चा झाली असून मुंबई व पुणे मार्गावरून शिर्डीला जाण्यासाठी वंदेभारत रेल्वे गाड्या या मार्गावरून चालवल्यास हा रेल्वेमार्ग व्यवहार्य होऊ शकतो, याबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक-पुणे सेमीहायस्पीड रेल्वे मार्ग महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातूनतो उभारला जाणार आहे. या मार्गासाठी साधारण १६ हजार ३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार महारेल कंपनीने आधी रेल्वे विभागाने केलेले सर्वेक्षण रद्द करून त्यात काही भागात बदल करण्यात आले. मात्र, हा रेल्वेमार्ग व्यवहार्य असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे प्रमाणपत्र मिळवण्याआधीच भूसंपादन प्रक्रिया सुरू केली होती.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत या प्रकल्पासाठी ४५ हेक्टर भूसंपादन केले आहे. मात्र, महारेलने प्रस्तावित केलेला रेल्वेमार्ग व्यवहार्य होत नसल्याने महाराष्ट्र सरकार व रेल्वेमंत्रालय यांच्याकडून याबाबत वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतला जात असून त्यातूनच हा रेल्वेमार्ग शिर्डीहून नेण्याचा प्रस्ताव समोर आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत फेब्रुवारीत घोषणाही केली आहे. एवढेच नाही, तर तत्पूर्वी या मार्गाचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे.
नाशिक-पुणे या रेल्वेचा प्रस्तावित मार्ग २३५ किलोमीटरचा असून तो मार्ग शिर्डीकडून वळवल्यास ३५ किलोमीटरने अंतर वाढणार आहे. मात्र, शिर्डीकडून मार्ग वळवल्यास हा मार्ग सपाट भागातून जाणार असून आधीच्या मार्गावरील १८ बोगद्यांचा खर्च वाचणार आहे. या घोषणेनंतर जवळपास तीन महिन्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानक येथे बैठक घेऊन या रेल्वेमार्गावर वंदेभारत चालवण्याबाबत चर्चा केली आहे.
त्यांच्या चर्चेनुसार हा नवीन रेल्वेमार्ग झाल्यास मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी तसेच दक्षिण भारतातील प्रमुख शहरांना पुणेमार्गे शिर्डीला जाण्यासाठी वंदेभारत ट्रेन चालवता येतील व साधारणपणे मुंबई व पुणे या दोन्ही बाजूंनी या मार्गावरून २४ वंदेभारत ट्रेन चालू शकतात, असा अंदाज आहे. यामुळे नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग व्यवहार्य होऊ शकतो. यामुळे भविष्यात नाशिक ते पुणे दरम्यानचा प्रवास कमीत कमी वेळेत होऊ शकणार आहे.
बैठकीस भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पांडेय आणि मुंबईतील मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे उपस्थित होते. हा प्रकल्प झाल्यास पुणे व नाशिक या दोन शहरांच्या मध्ये असलेल्या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.