नाशिक (Nashik) : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या वेगाची मर्यादा राज्याच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी निश्चित केली आहे. समृद्धी महामार्ग तयार करताना त्यावरून ताशी दीडशे किलोमीटर वेगाने वाहने धावू शकतील, याप्रमाणे बांधणी केली असली, तरी वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार या महामार्गावर सपाट भागात ताशी १२० किमी व बोगदे, घाटाच्या भागात ताशी १०० किमी वेगाने वाहने चालवता येणार आहेत. त्याचप्रमाणे वाहनांच्या प्रकारानुसार वेग निश्चिती करण्यात आली असून त्या वेगमर्यादेचा भंग करणाऱ्या वाहनधारकांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
राज्यात २०१६ मध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा करण्यात आली. सुरवातीला २०१९ पर्यंत हा महामार्ग पूर्ण केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, विरोधामुळे या महामार्गाचे भूसंपादन रखडले. यामुळे समृद्धी महामार्गाच्या प्रत्यक्ष कामास २०१९ मध्ये सुरवात झाली. राज्यात सत्तांतर होऊनही महामार्गाच्या उभारणीत अडथळा आला नाही. तसेच या महामार्गाचे नाव हिंदुहृय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग असे करण्यात आले.
राज्यातील १७ जिल्ह्यांना जोडणाऱ्या या समृद्धी महामार्गामुळे विदर्भ व मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार असून नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सात तासांमध्ये कापणे शक्य होणार असल्याचे सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. या महामार्गाच्या उभारणीची जबाबदारी राज्याच्या रस्ते विकास महामंडळाकडे असून हा महामार्ग उभारण्यासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. नागपूर ते कोपरगाव (जि. नगर) पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले असून या पूर्ण झालेल्या महामार्गावर लवकरच वाहतूक खुली करण्यात येणार आहे. या महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीला होणार असल्याच्याही चर्चा आहे. यामुळे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंतकुमाार सरंगल यांनी या महामार्गावरून वाहने चालवण्याची वेगमर्यादा निश्चित करणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वाहनांच्या प्रकारांवरून वेगवेगळी वेगमर्यादा असणार आहे. तसेच सपाट भागात, घाटरस्त्यांत व बोगद्यांमध्येही वाहनांची वेगमर्यादा वेगवेगळी असणार आहे. याशिवाय या वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहन धारकाविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
अशी असणार वेगमर्यादा
चालकासह आठ व्यक्तिंची क्षमता असणारी एम १ या प्रकारातील वाहनांसाठी सपाट भागात ताशी १२० किमी व घाट-बोगद्याच्या भागात ताशी १०० किमी वेग मर्यादा असणार आहे.
चालकासह नऊ व्यक्तिंपेक्षा अधिक व्यक्तिंची क्षमता असणाऱ्या एम१ व एम ३ या प्रकारांतील प्रवाशी वाहनांसाठी सपाट भागात ताशी १०० किमी व घाट-बोगद्याच्या भागात ताशी ८० किमी वेगमर्यादा असणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सपाट व घाट-बोगद्याच्या भागात ताशी ८० किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
दुचाकी-रिक्षांना परवानगी नाही
समृद्धी महामर्गावरून प्रवास करण्यास दुचाकी तसेच तीनचाकी व चारचाकी रिक्षांना परवानगी दिली जाणार नाही, असेही या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय वाहन प्रकार व रस्त्याचे भौगोलिक क्षेत्र यानुसार निश्चित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा ५ टक्के अधिक वेगाने वाहने चालवल्यास वाहन धारकाविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.