नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे पंधरा प्लॅस्टिक मोल्डिंग मशिन खरेदी करण्यासाठी दोन वर्षापूर्वी राबवलेली टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यास दीड वर्ष गेले. त्यानंतर कार्यारंभ आदेश देऊनही नऊ महिने झाले असून पुरवठादाराला एकदा मुदतवाढ देऊनही अद्याप एकही प्लॅस्टिक मोल्डिंग यंत्र सुरू झालेले नाही. ठेकेदाराच्या सोईसाठी केलेल्या अनियमिततेमुळे ही खरेदी वादात सापडली असून पंधरा ठिकाणच्या प्लॅस्टिक मोल्डिंग मशिन बसवण्याची बहुतांश ठिकाणची कामे पूर्ण होत आले असून आता केवळ वीजजोडणी बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन टप्पा दोनअंतर्गत प्लास्टिक कचरा संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय एक प्लास्टिक मोल्डिंग यंत्र देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाला २.४० कोटी रुपये निधी देण्यात आला. पाणी पुरवठा व स्वच्चता विभागाने फेब्रुवारी २०२२ मध्ये याची टेंडर प्रक्रिया राबवली. ती टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने फेरटेंडर राबवण्यात आले. त्यात १६ लाख रुपयांच्या निधीतूनच मशिन व मशिन चालवण्यासाठी शेड उभारणे अपेक्षित असताना व राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी या १६ लाख रुपयांमध्येच मशिन व ते ठेवण्यासाठीची व्यवस्था उभारली असताना नाशिक जिल्हा परिषदेने १४ लाख रुपये दराने १५ यंत्रांची खरेदी प्रक्रिया करून पुरवठादारास जुलै २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश दिले. चांगल्या दर्जाच्या नावाखाली जिल्हा परिषदेने जवळपास सर्व निधी या मशिन खरेदीसाठीच खर्च केला. प्लॅस्टिक मोल्डिंग मशिन चालवण्यासाठी शेड खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद नसल्यामुळे जिल्हा परिषदेने चलाखीने त्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपवली आहे.
स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने ही यंत्र बसवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १५ ग्रामपंचायतींची नावे निश्चित केली असून शिंदे दिगर (दिंडोरी), वाडीवरहे (इगतपुरी) ,मुसळगाव (सिन्नर),अंदरसूल (येवला), वाघेरा (त्र्यंबकेश्वर), कनाशी (कळवण), कोळीपाडा (पेठ), टेहरे (बागलाण), उमराणे (देवळा), वडनेर भैरव (चांदवड), करंजाळी (सुरगाणा), पिंपरीसैय्यद (नाशिक) ,पिंपळगाव बसवंत (निफाड), नागापूर (नांदगाव), टेहरे (मालेगाव) या १५ ग्रामपंचायतींना या यंत्रांसाठी शेड बसवण्याचा खर्च करण्याची जबाबदारी सोपवली आहे. या ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी अथवा पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेने दिल्या. त्यानुसार या ग्रामपंचायतींनी कामे केली आहेत. त्यापैकी कळवण तालुक्यातील कणाशी येथील शेडचे काम अद्याप अपूर्ण आहे. ते काम या महिन्यात पूर्ण होणार असल्याचे ग्रामपंचायतींकडून सांगितले जात आहे. उर्वरित १४ शेडची कामे पूर्ण झाली असली, तरी तेथे अद्याप मोल्डिंग मशिन बसवण्यात आले नाहीत. कारण अद्याप या ठिकाणी वीजजोडणी मिळालेली नाही. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार नऊ ठिकाणी वीजजोडणी झाली आहे. लवकरच हे सर्व प्रकल्प सुरू होतील. हे प्लॅस्टिक मोल्डिंग प्रकल्प एका संस्थेला चालवण्यासाठी दिले जाणार असून ते परिसरातील प्लॅस्टिक कचरा गोळा करून त्यापासून प्लॅस्टिक ग्रॅन्युअल बनवणार आहेत. यातून ग्रामीण भागातील प्लॅस्टिक कचर्याची समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. मात्र, जिल्हा परिषद पातळीवर चुकीच्या पद्धतीने ही योजना राबवल्यामुळे दोन वर्षांचे कालहरण झाले आहे.