नाशिक (Nashik) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हिरवा झेंडा दाखवलेल्या शुभारंभ केलेल्या बहुचर्चित मुंबई-शिर्डी या वंदे भारत रेल्वेगाडीला पहिल्या साात दिवसांमध्ये केवळ ६४ टक्के प्रतिसाद मिळाला आहे. गाडी सुरू झाल्यापासून केवळ एक दिवस पूर्ण क्षमतेने प्रवाशांनी प्रवास केला असल्याचे रेल्वे विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. मुंबईतील साई भक्तांसाठी शिर्डीला जाण्यासाठी ही विशेष गाडी सुरू केली आहे.
मध्य रेल्वेने वंदे भारत सुरू केली. मुंबईहुन शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांसाठी सुरु करण्यात आलेली ही वंदेभारत एक्सप्रेस ताशी १६० किलोमीटर वेगाने धावते. या अत्याधुनिक एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी अनेक चांगल्या सुविधा आहेत. मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना नजरेसमोर ठेवून रेल्वेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र, शिर्डीहून मुंबईला परतीच्या मार्गावरील नाशिक, मनमाड येथील प्रवाशांचा विचार करण्यात आलेला नाही. मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांचा विचार केला असता तर मनमाड व नाशिकहुन मुंबईला जाणारे प्रवाशीही या गाडीतून जाऊ शकतील, असे मत व्यक्त होत आहे.
वंदे भारत एक्सप्रेसची प्रवाशी क्षमता ११२८ आहे. गाडी सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ १२ फेब्रुवारी या दिवशी ११५८ म्हणजे १०२ टक्के प्रवाशांनी प्रवास केला. आठवड्यातील उर्वरित दिवशी एकही दिवस या गाडीतून ७६ टक्क्यांपेक्ष अधिक प्रवाशांनी प्रवास केला नाही. यामुळे प्रवाशी संख्या कमी असण्यामागील कारणांचा शोध मध्यरेल्वेकडून घेतला जात आहे .याबाबत नुकतीच याबाबत बैठक होऊन त्यात या गाडीच्या वेळापत्रक, थांब्यांबाबत तसेच प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत चर्चा झाली.
या रेल्वेच्या मार्गावर मनमाड हे प्रमुख जंक्शन असूनही तेथे वंदेभारतला थांबा नाही. तसेच नाशिक दर्शन या गाडीच्या वेळापत्रकाशीही वंदेभारतची वेळ जुळत नाही. याबाबी समोर आल्या आहेत. त्याबाबत सुधारणा करण्याची चर्चा झाल्याचे समजते. वंदेभारतची वेळ शिर्डीला जाताना मुंबईतील साईभक्तांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे. तसेच शिर्डीहुन मुंबईला जाताना तिची वेळ मनमाड, नाशिकहुन मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवून वेळापत्रक तयार करावे, अशी मागणी समोर आली आहे.
दरम्यान मुंबईतील भाविक रात्री रेल्वेत आराम करून एका दिवसात शिर्डीला दर्शन करून पुन्हा माघारी फिरता यावे. या नियोजनाने वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली आहे. मात्र आठवड्यात हे चित्र बघता, अजून रेल्वेला शंभर टक्के प्रतिसाद नाही. मुंबईतील भाविकांची रेल्वेगाडीचा आनंद घ्यावा, असे आवाहन भुसावळ विभागाचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अनिल बागले यांनी म्हटले आहे.