नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने उभारलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी जवळपास २५ कोटी रुपयांचा खर्च येणार असून, त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीच्या (Ramoji Film city Hyderabad) धर्तीवर हा विकास केला जाणार असून, त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने स्वारस्य देकार मागविले आहेत. सल्ला देण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. (Dadasaheb Phalke Memorial Nashik)
महापालिकेकडून पांडव लेण्यांच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. फाळके स्मारक नाशिककरांचे महत्त्वाचे मनोरंजन केंद्र झाले होते. मात्र, स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाबरोबरच वॉटर पार्क, रेस्टॉरंट व पार्किंग आदी कामे घेण्यासाठी नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू झाल्यानंतर स्मारकाचा बट्ट्याबोळ उडण्यास सुरवात झाली. फाळके स्मारक म्हणजे महापालिकेसाठी हत्ती पोसण्यासारखे झाले. उत्पन्न दहा लाख, तर खर्च मात्र एक ते दीड कोटी रुपये येत असल्याने महापालिकेला परवडत नव्हते. त्यामुळे समस्या वाढून स्मारकाला अवकळा प्राप्त झाली. स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपच्या कारकिर्दीत घेण्यात आला.
तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी त्यासाठी आग्रही राहिले. सिनेदिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओ संस्थेला तीस वर्षे मुदतीसाठी स्मारक देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लेखापरीक्षकांनी महापालिकेला मिळणाऱ्या रॉयल्टीवर हरकत घेतली. याच दरम्यान छगन भुजबळ यांनी महापालिकेला भेट दिली. त्या वेळी स्मारकाच्या खासगीकरणाला विरोध दाखविला परिणामी टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.
रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकास
आता हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर फाळके स्मारक विकसित केले जाणार आहे. पुनर्विकासासाठी जवळपास २५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. स्मारक पुनर्विकासाच्या कामाचे नियोजन व नियंत्रण करण्याबरोबरच स्मारकामध्ये कुठल्या बाबींचा समावेश असेल यासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने स्वारस्य देकार देखील मागविले. सल्लागाराला सल्ल्यापोटी जवळपास दीड कोटी रुपये मोजण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.