नाशिक (Nashik) : नाशिक शहरात ठेकेदारांनी तयार केलेल्या 'खड्डेयुक्त रस्त्यां'ची माहिती आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मागवली आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षांत शहरातील किती रस्त्यांचे काम झाले, किती बिल दिले व ठेकेदार कोण होते, ही माहिती मागवण्यामागे संबंधितांना काळ्या यादीत टाकण्याची तयारी असल्याचे मानले जात आहे. (Nashik - Contractors - Potholes)
नाशिक शहरातील रस्त्यांना पावसाळ्यात प्रचंड खड्डे पडले असून, जुलै अखेरपासून हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी महालिकेने 27 कोटींची तरतूद केली. मात्र, ऑगस्टमध्ये आलेल्या पावसामुळे बुजवलेल्या खड्यांमधील मुरूम वाहून गेला. तसेच मोठ्या खड्ड्यांमध्ये बसवलेले पेव्हरब्लॉकही विस्कळीत होऊन आता खड्डे जैसे थे झाले आहेत. याबाबत नागरिकांची ओरड वाढली असून, महापालिकेच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ लागली आहे. याची दखल घेत खासदार हेमंत गोडसे व शिवसेनेचे महापालिकेतील माजी गट नेते अजय बोरस्ते यांनी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी रस्ते तयार केल्यानंतर त्याची तीन वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी सबंधित ठेकेदारांची असताना महापालिका खड्डे का बुजवत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच तीन वर्षांपूर्वी तयार झालेल्या रस्त्यांवरच नाही, तर सहा महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडल्याचे निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरात मागील तीन वर्षांत तयार केलेल्या रस्त्यांची माहिती मागवली आहे. यामध्ये त्यांनी किती कामे केली, कोणत्या भागात झाली, कोणी केली यासह त्यांची बिले कधी दिली, ही माहिती देण्यास सांगितले आहे. ही माहिती मागवल्यामुळे आता या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई होऊ शकते, असे महापालिकेत बोलले जात आहे.