नाशिक (Nashik) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो निओचा नारळ महिनाभरात फुटेल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना दिली. हा प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे मान्यतेसाठीपडून आहे. पालकमंत्री भुसे यांनी नाशिक शहराशी संबंधित असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. या वेळी विविध प्रलंबित प्रकल्पात संबंधात पालकमंत्र्यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली.
पालक मंत्री भुसे यांनी निओ मेट्रो प्रकल्पाबाबत विचारणा केली. यावर नाशिक शहरात टायरबेस्ड निओ मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यातहा प्रकल्प असल्याची माहिती आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिली. त्यामुळे येत्या महिन्याभरात मेट्रोचा नारळ फुटून नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. बैठकीला खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले उपस्थित होते.
पालकमंत्री भुसे यांनी सिंहस्थ कुंभमेळा आराखडा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा आढावा घेतला. तसेच सविस्तर विकास आराखडा करण्याच्याही सूचना दिल्या. यावेळी शहरातील अपघाती ठिकाणांचा आढावा घेतला तसेच मिर्ची चौकात उड्डाणपूल उभारण्याबाबत चर्चा झाली. तसेच महापालिका हद्दीतील सहा किलोमीटर पेठरोडचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.