Nashik News नाशिक : राज्याच्या अर्थमंत्र्यांनी २०२३-२४ चा अंर्थसंकल्प सादर करताना निर्मळवारी योजनेंतर्गत संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या वारीप्रमाणेच संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका व संत मुक्ताई या दिंडी सोहळ्यांना निर्मळवारीसाठी २० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेला मागील वर्षी जुलैमध्ये पत्र पाठवून आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांनी त्याला काहीही प्रतिसाद दिला नाही.
अखेर एप्रिल २०२४ मध्ये ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुन्हा पत्र पाठवून दिंडीतील भाविकांना पाणी, आरोग्य सुविधा व शौचालय सुविधांबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले. त्या पत्राला महिना उलटूनही जिल्हा परिषदेने अद्याप प्रस्ताव पाठवला नाही. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यातील भाविकांना निर्मळवारीतील सुविधांपासून वंचित राहावे लागणार असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रातून दरवर्षी पंढरपूरला आषाढीवारीसाठी दिंडी सोहळ्याद्वारे संतांच्या पालख्या जात असतात. या दिंड्यांमध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी असल्यामुळे सार्वजनिक स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याचा तसेच दिंडीतील वारकरी यांच्याही आरोग्याचा प्रश्न समोर येत आहे. यामुळे राज्य सरकारने निर्मळवारी या संकल्पनेदवारे दिंडीतील भाविकांना पिण्याचे पाणी व फिरते शौचालय व दैनंदिन सुविधा पुरवण्यात येत असते.
संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकोबाराय यांचे पालखी सोबतच संत सोपान देव, संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताई यांचे पालखीतील वारकरी यांना निर्मलवारीसाठी २० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा २०२३ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर ग्रामविकास मंत्रालयाने या घोषणेप्रमाणे निधी देण्यासाठी जुलैमध्ये पुणे, नाशिक व जळगाव या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून निर्मळवारीचा निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, नाशिक व जळगाव जिल्हा परिषदेने या पत्राकडे दुर्लक्ष केले.
या जिल्हा परिषदांचे प्रस्ताव न आल्याने ग्रामविकास विभागाने एप्रिलमध्ये या जिल्हा परिषदांना पुन्हा एप्रिलमध्ये पत्र पाठवले असून निर्मळवारीसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, फिरचे शौचालय व आरोग्य सेवा याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे स्मरण करून दिले. संत मुक्ताई पालखी सोहळा काही दिवसांत प्रस्थान करणार असून संत निवृत्तीनाथ पालखी सोहळाही २१ जूनला प्रस्थान करणार असून आता मेचा शेवटचा आठवडा सुरू आहे.
या पार्श्वभूमिवर नाशिक जिल्हा परिषदेने अद्याप ग्रामविकास विभागाला प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी निर्मळवारीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.
हा प्रस्ताव तयार करण्यासाठी ग्रामपंचायत, पाणी पुरवठा व स्वच्छता व ग्रामीण पाणी पुरवठा या विभागांच्या प्रमुखांची बैठक होणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप बैठकही झालेली नाही. यामुळे प्रस्ताव तयार कधी होणार व तो ग्रामविकास मंत्रालयाला पाठवणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा प्रस्ताव वेळेवर सादर न झाल्यास यवर्षी संत निवृत्तीनाथ महाराज पालखीसोहळ्यासोबतचे वारकरी या सुविधांपासून वंचित राहणार असून त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.