नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेअंतर्गत दहा वाहने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, टेंडर उघडण्याची मुदत संपून पाच महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी प्रशासनाने टेंडर उघडलेली नसल्याचे समोर आले आहे. विशिष्ट ठेकेदाराला मुदतवाढ देण्यासाठी प्रशासनाकडून विलंब केला असल्याचा आरोप टेंडरप्रक्रियेत सहभाग घेतलेल्या ओम साई टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स या कंपनीने केला आहे.
याबाबत, त्यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही केली आहे. जिल्हा परिषदेतर्फे १४ फेब्रुवारी २०२४ ला दहा वाहने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले होते. २५ फेब्रुवारीला ती उघडण्यात येणार होते, मात्र तब्बल पाच महिले उलटूनही आजतागायत उघडण्यात आलेली नाही. पाच महिन्यांपासून जुन्या पुरवठाधारकास मुदतवाढ दिली जात आहे.
टेंडरप्रक्रियेत भाग घेतलेल्या ओम साई टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे प्रशासनाच्या भूमिकेविषयी शंका घेत तक्रार करण्यात आली. सोमवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांची भेट घेत त्यांच्याकडे संबंधित कंपनीने लेखी तक्रार केली आहे. लवकरात लवकर टेंडर उघडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
''लोकसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने विलंब झाला असावा. मात्र पाच महिने होऊनही टेंडर प्रक्रिया न राबवणे, ही बाब चुकीची आहे. टेंडर प्रक्रियेची माहिती घेऊन पुढील निर्णय तत्काळ घेतला जाईल.''
- डॉ. अर्जुन गुंडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद