नाशिक (Nashik) : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने मंजूर केलेल्या १२२२ पाणी पुरवठा योजनांपैकी १६४ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांची लवकरच चाचणी घेण्याच्या सूचना त्रयस्थ संस्थेला दिल्या जाणार आहे. या चाचण्यांनंतर या योजना संबंधित ग्रामपंचायतींना हस्तांतरीत केल्या जातील, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी दिली. जलजीवन मिशन अंतर्गत ३१ मार्चपर्यंत या सर्व पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
केंद्र सरकारने प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा या ध्येयाने जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे. या योजनेतून ३१ मार्च २०२४ पर्यंत पाणी पुरवठा योजनापूर्ण करून शंभर टक्के घरांना नळादवारे पाणी पुरवले जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या समसमान निधीतून या पाणी पुरवठा योजना होत असून जिल्हा परिषदेचा ग्रामीर पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होत आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १२२२ पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. या योजनांपैकी ५७ योजनांची कामे कार्यारंभ आदेश देऊनही तांत्रिक कारणांमुळे सुरू झालेली नाही. उर्वरित योजनांची कामे सुरू असून जवळपास ८३९ योजनांची ३० टक्क्यांपेक्षा अधिक कामे झाली असून टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स या त्रयस्थ संस्थेकडून या कामांची पहिली तपासणी झाली आहे. तसेच मागील जूनपर्यंत ६०५ विहिरींची पाणी उपलब्धता तपासणीही झाली आहे. त्यातील ५० विहिरींची पाणी उपलब्धता चाचणी अपयशी ठरल्याने या योजनांसाठी नवीन विहिरी खोदण्यासाठी परवानगी देण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या योजनांपैकी १६४ योजनांची विहिर, जलकुंभ व जलवाहिनी ही प्रमुख कामे पूर्ण झाली आहेत. आता या पूर्ण झालेल्या योजनांची जलचाचणी बाकी आहे. यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून त्रयस्थ संस्थेला या पूर्ण झालेल्या योजनांची जलचाचणी करण्याचे निर्देश दिले जाणार आहे. त्रयस्थ संस्थेकडून चाचणी यशस्वी झाल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यानंतर या योजना संबंधित ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यामुळे दुष्काळी परिस्थितीत या योजना सुरू झाल्यास नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
कळवणमध्ये सर्वाधिक योजना पूर्ण
जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या १२२२ पाणी पुरवठा योजनांपैकी कळवण तालुक्यात सर्वाधिक ३३ योजना पूर्ण झाल्या असून त्या खालोखाल निफाड तालुक्यातील ३० योजना पूर्ण झाल्या आहेत. इतर तालुक्यांमधील कामे पूर्ण झालेल्या योजनांची
संख्या पुढील प्रमाणे :
इगतपुरी : ७
कळवण : ३३ 33
चांदवड : ५
त्रिंबक : १०
दिंडोरी : १९
देवळा : ६
नांदगाव : १०
निफाड : ३०
पेठ : १
बागलाण : १०
मालेगाव : ६
येवला : ६
सिन्नर : ४
सुरगाणा : १४