Nashik : जलजीवनची 87 टक्के कामे पूर्ण; उरलेल्या कामांसाठी तीन महिन्यांचा कालावधी

Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionTendernama
Published on

नाशिक (Nashik) : जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची आतापर्यंत ७६३ कामे पूर्ण झाली असून, ४५९ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. योजनांची कामे पूर्ण करण्याचा वेग कमी असला तरी वैयक्तिक नळजोडणीची कामे पूर्ण करण्यात जिल्हा आघाडीवर आहे. वैयक्तिक नळजोडणीच्या निश्चित केलेल्या सात लाख १८ हजार १५२ उद्दिष्टांपैकी आतापर्यंत सहा लाख २६ हजार ९४८ कामे पूर्ण (८७.२७ टक्के) झाली आहेत.

Jal Jeevan Mission
Nashik : खासदार भगरेंनी जिल्ह्यातील रस्ते, पुलांच्या कामासंदर्भात घेतली गडकरींची भेट

९१ हजार २०४ नळजोडणीची कामे अपूर्ण असून, ही कामे तीन महिन्यांत पूर्ण करण्याची कसरत जिल्हा परिषदेला करावी लागणार आहे. एकूण दिलेल्या उद्दिष्टांपैकी दर वर्षी नळजोडणीची उद्दिष्टे ठरवून दिली जातात. त्यानुसार २०२४-२५ या वर्षाकरिता ९६ हजार ३७४ उद्दिष्टे दिलेली आहेत. यापैकी ३० जूनअखेर चार हजार ९५१ नळजोडणीची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत एक हजार २२२ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या एक हजार २२२ योजनांमध्ये आधी अस्तित्वात असलेल्या पण नव्याने विस्तारीकरण केल्या जात असलेल्या रेट्रोफिटिंग योजनांची संख्या ६८१ असून, त्यांच्यासाठी ७१२ कोटी रुपयांच्यया निधीची तरतूद केली आहे. तसेच पूर्णत: नवीन असलेल्या पाणीपुरवठा योजनांची संख्या ५४१ आहे.

Jal Jeevan Mission
Nashik : विकासकामे मार्गी लावण्यासाठी महापालिकेकडे अवघे तीन महिने

या नवीन योजनांसाठी ६९७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या पाणीपुरवठा योजनेंतर्गतच लोकांना वैयक्तिक नळजोडणी करून द्यायची आहे. पाणीपुरवठा योजनांचा विचार केल्यास जून २०२४ अखेरपर्यंत एक हजार २२२ योजनांपैकी भौतिकदृष्ट्या ७६३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. यातील ६६७ योजनांतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. २४ कामांना अद्याप प्रारंभ झालेला नाही. पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा वेग तीन महिन्यांत दुष्काळामुळे मंदावला असून, त्याचा काहीसा फटका वैयक्तिक नळजोडणीच्या कामावर झाल्याचे दिसत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण सात लाख १८ हजार १५२ नळजोडणीची उद्दिष्टे निश्चित केली आहेत. यापैकी गतवर्षात पाच लाख ६८ हजार २११ नळजोडणीची काम पूर्ण झाली आहेत.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात एक लाख ४९ हजार ९४१ नळजोडणीचे उद्दिष्ट होते. यापैकी मार्च २०२४ अखेर ५३ हजार ५६७ जोडणीची काम पूर्ण झाली आहेत. उर्वरित ९६ हजार ३७४ नळजोडणीची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी निश्चित केले आहे. त्यापैकी तीन महिन्यांत केवळ चार हजार ९५१ कामे पूर्ण झाली आहेत. योजना पूर्ण होतील, त्याप्रमाणे नळजोडणीची कामे पूर्ण करावयाची आहेत. पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२४ ची ‘डेटलाइन’ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने निश्चित केली आहे. त्यानुसार विभागाला तीन महिन्यांत ९१ हजार २०४ नळजोडणीची कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com