नाशिक (Nashik) : नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik Z P) ग्रामपंचायत विभागाने यावर्षी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात ६८४ शाळांना संरक्षक भिंती बांधण्याच्या कामांचा समावेश केला आहे. ही सर्व कामे झाल्यास जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना संरक्षक भिंती उपलब्ध होऊ शकणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात ३,२६६ शाळा आहेत. शाळा इमारत बांधताना त्यात संरक्षक भिंतीच्या कामांचा समावेश नसतो. यामुळे शाळा इमारत झाल्यानंतर तेथील शाळेला खासगीपण नसते. आजूबाजूचे प्राणी थेट वर्गखोलीपर्यंत येत असतात. आजूबाजूचे रहिवाशी त्यांचे पाळीवप्राणी शाळेच्या पडवीत बांधत असतात. यामुळे शाळेला संरक्षक भिंती बांधण्यासाठी शिक्षकांकडून प्रयत्न होत असतात. दरम्यान शाळांना संरक्षक भींत बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे लेखाशीर्ष नसल्यामुळे शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला निधी मिळत नाही. यामुळे आमदार निधी, खासदार निधी, जिल्हा परिषद सदस्यांचा सेस व लोकवर्गणीच्या माध्यमातून शिक्षकांनी पाठपुरावा करून संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. यानंतरही जिल्ह्यातील ८२६ शाळांना अद्यापही संरक्षक भिंती नाहीत. तसेच त्यांच्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणे शक्य नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने २०२२-२३ या वर्षाचा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आराखडयात ६८४ शाळांना संरक्षक भिंती बांधण्याच्या कामांचा समावेश केला आहे. यावर्षी ग्रामपंचायत विभागाने रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात दोन लाख कामांचा कामांचा समावेश आहे.
नुकतेच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री दादा भुसे यांनी जळगावप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही शाळांना संरक्षक भिंती बांधण्याची कामे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात यावीत, अशा सूचना केल्या होत्या. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्यावतीने यावर्षी रोजगार हमी योजनेतून ६८४ शाळांना संरक्षक भिंतीचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
१४२ शाळांना अडचण
जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात शाळांना संरक्षक भिंत बांधण्याच्या कामांचा समावेश करताना जिल्हा भरातून माहिती घेतली, तेव्हा ८२६ शाळांना संरक्षक भिंती नसल्याचे समोर आले. प्रत्येक शाळेकडून माहिती मागवली असता १४२ शाळांना संरक्षक भिंत बांधणे शक्य नसल्याचे कळवण्यात आले. त्यात प्रामुख्याने शाळेला पुरेसी जागा नसणे, शेजारून रस्ता असणे आदी कारणे समोर आली. यामुळे त्या शाळा वगळून इतर ६८४ शाळांना संरक्षक भिंती बांधण्याच्या कामांचा समावेश करण्यात आल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.
सात कामे पूर्ण
जिल्हा परिषदेने ६८४ शाळांना संरक्षक भिंती बांधण्याचा निर्णय घेतला असला, तरी आतापर्यंत केवळ २० कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १४ कामे सुरू होऊन त्यातील सात कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षाचे सहा महिने झाले असून, उर्वरित सहा महिन्यांमध्ये आराखड्यात नमूद कामे करण्याचे जिल्हा परिषदेसमोर आव्हान आहे. जिल्हा परिषदेच्या विभागाने काम प्रस्तावित केल्यानंतर बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांकडून तांत्रिक मान्यता घेणे, रोजगार हमी योजनेच्या नियम व निकषांप्रमाणे कुशल, अकुशल मजुरांच्या प्रमाणानुसार काम पूर्ण करणे आदी किचकट बाबी असल्यामुळे एका वर्षात ही कामे पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.