नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचे ५९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल (ZP CEO Ashima Mittal) यांनी मान्यता दिली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचे अंदाजपत्रकात जवळपास १३ कोटींची वाढ झाली आहे. यात मागील वर्षीच्या शिल्लक राहिलेले १८.२० कोटी रुपये व ठेवींवरील व्याजाचे २७ कोटी यांचा वाटा महत्त्वाचा आहे.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कल्पनेतील योजनांसाठी जवळपास सहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात सुपर १०० व प्रत्येक तालुक्यात एक प्रयोगशाळेसाठी प्रत्येकी दीड कोटींचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४६ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. प्रत्यक्षात सुधारित अंदाजपत्रकात त्यात सहा कोटींची घट होऊन ते ४० कोटींवर खाली आले. यामुळे यावर्षी अंदाजपत्रक तयार करताना लेखा व वित्त विभागाने २०२४-२५ या वर्षात ४०.८५ कोटी रुपये जमा होतील, असे गृहित धरले आहे.
या रकमेत ठेवींवरील व्याजापासून २७ कोटी रुपये व उपकरांपासून १३ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे गृहित धरून या वर्षाच्या शिल्लक १८ कोटींचा समावेश करून ५८.९९ कोटींचे अंदाजपत्रक मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी सादर केले. या अंदाजपत्रकास मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी मान्यता दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
समाजकल्याणची तरतूद वाढवली
शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेला सेसनिधीच्या २० टक्के रक्कम समाजकल्याण विभागाला, महिला व बालकल्याण विभागासाठी दहा टक्के, दिव्यांग कल्याण पाच टक्के, ग्रामीण पुरवठा विभाग २० टक्के व शाळा दुरुस्तीसाठी पाच टक्के अशी ६० टक्के रकमेची तरतूद करणे बंधनकारक आहे. त्यानुसार अंदाजपत्रकात या साठी १५.४९ कोटींची तरतूद करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८.२ कोटींची तरतूद केली आहे.
समाजकल्याण विभागाला २.६६ कोटींच्या तुलनेत ३.९० कोटी रुपये तरतूद केली आहे. तसेच महिला व बालविकास, दिव्यांग कल्याण मिळून जवळपास ६० लाखांची तरतूद वाढवण्यात आली आहे.
नावीन्यपूर्ण योजनांसाठीची तरतूद
प्रत्येक तालुक्यात एक प्रयोगशाळा : १.५० कोटी रुपये
स्मार्ट अंगणवाडी : १.३५ कोटी रुपये
सुपर १०० योजना : १.५ कोटी रुपये
पीएचसींना साहित्य खरेदी : १ कोटी रुपये
इंग्लिश स्पेलिंग स्पर्धा : २० लाख रुपये
पशुवैद्यकीय दवाखाने कायापालट : ५० लाख रुपये