नाशिक (Nashik) : रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या पुनर्विकासासाठी पुन्हा एकदा सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सल्लागार नियुक्तीसाठी अटी-शर्तीत बदल करून येत्या दोन दिवसांत फेरटेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांत सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली.
या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीवर आतापर्यंत २४ वर्षांत १२ कोटी रुपये खर्च केले आहेत. यापूर्वी तत्कालीन आयुक्त कैलास जाधव, डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांना न पेललेले हे शिवधनुष्य विद्यमान आयुक्तांनी नव्याने उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक नाशिकचे असल्यामुळे महापालिकेने पाथर्डी शिवारात १९९९ मध्ये पांडव लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेत चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक तयार करण्यात आले. स्मारकाची देखभाल व दुरुस्ती खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू झाल्यानंतर दुरवस्था सुरू झाली. आतापर्यंत या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीवर महापालिकेने १२ कोटी रुपये खर्च केले आहेत.
दरम्यान महापालिकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी अंदाजपत्रकात योजनेचा समावेश केला. पुनर्विकासासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खासगीकरणातून विकास करण्यास विरोध केल्यानंतर स्वनिधीतून प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याबाबत काहीही हालचाल झाली नाही.
महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर दादासाहेब फाळके स्मारकाचा विकास करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यासाठी बांधकाम विभागाकडून स्वारस्य देकार मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आता महापालिकेच्या बांधकाम विभागाने अटीशर्तींमध्ये बदल केला आहे.
येत्या दोन दिवसांत या प्रकल्प सल्लागार नियुक्तीचे फेरटेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे. अटीशर्ती बदलल्यामुळे या टेंडरला प्रतिसाद मिळेल, असा महापालिकेला विश्वास असून पंधरा दिवसांत सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर महापालिकेने यापूर्वीच राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाकडे चित्रनगरीच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांची मागणी पत्रान्वये केली असून, त्याला अद्याप काहीही प्रतिसाद मिळालेला नाही.