नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेकडून शहरातील नागरिकांना पुरवल्या जात असलेल्या पिण्याच्या पाण्याची ३५ ते ४० टक्के गळती होऊन महापालिकेला दरवर्षी ६४ कोटींचा तोटा सहन करावा लागती आहे.
ही पाणीगळती रोखण्यासाठी तसेच प्रत्यक्ष पुरवले जात असेले पाणी व नागरिकांकडून होत असलेला वापर, या पाण्याचा हिशेब जुळवण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या वतीने स्काडा तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
यात पहिल्या टप्प्यात जवळपास २५ हजार व्यावसायिक नळजोडण्यांना स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू असताना आता जलकुंभ, पंपिगस्टेशन आणि जलशुद्धीकरण केंद्रावर देखील स्काडा मीटर व सेंसर बसवले जाणार आहेत. सध्या नाशिक महापालिकेचा पाणी पुरवठ्यावर १३० कोटी रुपयांचा खर्च होत असताना पाणीपट्टीद्वारे वर्षाला केवळ ६४ कोटी रुपये महसूल मिळत आहेत.
यामुळे सध्याच्या पाणीवितरण व्यवस्थेतून होत असलेला तोटा कमी करण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीने स्काडामीटर व सेंसरचा बसवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
नाशिक महापालिका गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून रोज ५४८ दशलक्ष लिटर पाणी उचलते. त्या पाण्यावर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेअंती नाशिककरांना ४३८ दशलक्ष लिटर दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. यापैकी प्रत्यक्षात केवळ २९७ दशलक्ष लिटर पाण्याचीच पाणीपट्टी आकारली जाते. उर्वरित १४१ दशलक्षलीटर पाण्याची गळती होते, असे दाखवले जाते.
महापालिकेचा पाणीपुरवठ्यावर वार्षिक १३० कोटी रुपयांचा खर्च होत असताना पाणीपट्टीद्वारे केवळ ६४ कोटी रुपये महसूल मिळतो. यामुळे दरवर्षी महापालिकेला पाणीपुरवठा व्यवस्थापनातून ६६.५४ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पाणीपट्टीच्या दरात तिपटीपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मागील वर्षी तयार केला होता. मात्र, त्याला विरोध झाल्यामुळे तो मागे घेण्यात आला.
नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे प्रमाण ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत आहे. त्यातल्या त्यात जलकुंभ ते नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्यात सर्वाधिक गळती होत असते. त्यामुळे नागरिकांच्या घरापर्यंत जाणाऱ्या पाण्याच्या थेंब अन् थेंबाचा हिशेब लावण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीची मदत घेतली जात आहे.
स्मार्टसिटी कंपनीकडून तसा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यांत्रिकी व विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी दिली. यामुळे पहिल्या टप्प्यात पाणी गळती नेमकी कोणत्या ठिकाणी होते, याचा शोध घेता येणार असून, त्यानंतर ही पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करता येणार असल्याचे सांगण्यात येते.
या ठिकाणी बसवणार स्काडा मीटर व सेंसर तंत्रज्ञान
शिवाजी नगर जलशुध्दीकरण केंद्र
गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्र
नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र
बोरगड पंपिंग स्टेशन
बुधवार पेठ पंपिंग स्टेशन
चेहेडी बंधारा पंपिंग स्टेशन
द्वारका पंपिंग स्टेशन
गोपाल नगर पंपिंग स्टेशन
नवीन चुंचाळे पंपिंग स्टेशन
जुने चुंचाळे पंपिंग स्टेशन
सावता नगर पंपिंग स्टेशन