नाशिक (Nashik) : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी (Surat - Chennai Greenfield Expressway) जमीन देणाऱ्या सोलापूर (Solapur) व धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला न मिळाल्याने तेथे भूसंपादनाविरोधात आंदोलन सुरू आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील आंदोलनामुळे नाशिकमध्येही आंदोलनाचा भडका उडू नये म्हणून नाशिकसह दिंडोरी, निफाड व सिन्नर तालुक्यांमधील भूसंपादसाठी जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसाही पाठवल्या जात नसल्याची चर्चा आहे.
भारतमाला प्रकल्पांतर्गत सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे तयार केला जाणार आहे. हा एक्सप्रेस वे महाराष्ट्रातील नाशिक, नगर, धाराशिव व सोलापूर या चार जिल्ह्यांमधून जाणार आहे. या महामार्गाचे सर्वेक्षण होऊन रेखांकनही झाले आहे. तसेच या महामार्गासाठी जमिनी जात असलेल्या जमीन धारकांना हरकती घेण्यासाठी प्रसिद्धीही देण्यात आली. त्यानुसार सुनावण्या होऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न मागील वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होता.
त्याचप्रमाणे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी याबाबत आढावा बैठक घेत भूसंपादन विभागाला भूसंपादन प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र अद्याप नाशिक जिल्ह्यातील जमिनींचे मूल्यांकन झालेले नसल्याने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू सुद्धा झाली नाही.
दरम्यान सोलापूर व धाराशिव येथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून, बागायती जमिनींचे मूल्यांकन कमी धरल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे मूल्यांकन वाढवण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये शेतक-यांनी आंदोलने सुरू केली आहेत. त्याचा परिणाम नाशिकमध्ये देखील दिसून येत आहे.
या आंदोलनामुळे नाशिक जिल्हा प्रशासन मूल्यांकन जाहीर करीत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, रामशेज, पिंपळनारे या दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये नोटिसा बजावण्यासाठी जमिनी मोजण्याचे काम सुरू आहे.
असा आहे प्रकल्प...
- सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस-वेच्या माध्यमातून नाशिक-सुरत प्रवास अवघ्या दोन तासांत
- नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि ७० गावांमधून महामार्ग जाणार आहे.
- नाशिक जिल्ह्यात १९५ हेक्टर भूसंपादन होणार
- नाशिक जिल्ह्यात १२२ किलोमीटर महामार्ग
- महामार्ग सहापदरी असून पाच मीटरचे दुभाजक आहे.
- नाशिक जिल्ह्यात महामार्ग २६ किलोमीटर भागात जंगलातून जाणार
- सुरगाणा तालुक्यातील संबरकल येथे १.३५ किलोमीटरचा बोगदा करणार
- सिन्नर तालुक्यात वावी येथे समृद्धी महामार्गाशी कनेक्ट