नाशिक (Nashik) : आद्यक्रांतिकारक (स्व.) राघोजी भांगरे यांचे जन्मगाव सोनोशी (ता. इगतपुरी) आहे. तसेच अकोले तालुक्यातील वासळी हे त्यांचे गाव आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या मूळगावी व जन्मगावी स्मारक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आमदार ॲड. माणिककराव कोकाटे यांनी वासळी येथील स्मारकासाठी १५० कोटींचा आराखडा तयार केला असला, तरी त्याला अद्याप सरकारची मान्यता मिळालेली नाही. तसेच खासदार हेमंत गोडसे व आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेला सोनोशी येथील ३० कोटींचा आराखडा ग्रामविकास मंत्रालयाने नाकारला असून, केवळ १३ कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता दिली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यात हस्तक्षेप करून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक तांत्रिक बाबींमध्ये अडकले असल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या इगतपुरी तालुक्यातील सोनोशी या जन्मगावी प्रस्तवित करण्यात आलेल्या स्मारकाबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव विजय सौरभ आदी उपस्थित होते.
आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे सोनोशी येथे भव्य स्मारक व्हावे, यासाठी अनेक आदिवासी बांधवांच्या संघटनांकडून खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे मागणी आहे. यामुळे शासनाने या स्मारकासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी या स्मारकासाठी ३० कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. त्याचप्रमाणे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे मूळगाव असलेल्य अकोले तालुक्यातील वासळी येथेही यांचे स्मारक व्हावे, यासाठी आमदार कोकाटे प्रयत्नशील आहेत. या ठिकाणी भव्य स्मारक व रोप वे प्रस्तावित करण्यात आला आहे. या स्मारकामुळे त्या भागातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
सोनोशी येथील स्मारकाचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तांत्रिक मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवला होता. मंत्रालयातून ३० कोटीऐवजी १३ कोटींचा खर्च ग्राह्य ठरवण्यात आला आहे. दरम्यान स्मारक उभारणीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत १३ कोटींची तांत्रिक मान्यता दिल्याने याबाबत चर्चा झाली.
सुरवातीला मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधला. खासदार गोडसे यांनी आदिवासी बांधवांची अस्मिता असून, सोनोशी येथे भांगरे यांचे स्मारक होणे गरजेचे आहे व त्याचा ३० कोटींचा प्रस्ताव मान्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रस्तावातील रक्कम आणि तांत्रिक मान्यतेची रक्कम यात मोठी तफावत असल्याने फेरप्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या स्मारकासाठी हवी असलेली काही जमीन शासनाच्या ताब्यात असून, काही जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.
दरम्यान आमदार कोकाटे यांनी प्रस्तावित केलेल्या अकोले तालुक्यातील स्मारकाबाबत अद्याप मान्यता मिळाली नसताना इगतपुरी तालुक्यातील स्मारकही तांत्रिक बाबींमध्ये अडकले असल्याचे दिसत आहे.