नाशिक (Nashik) : महापालिकेच्या (NMC) २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात (Budget) बांधकाम विभागाच्या रस्ते, पूल व सांडवे या बांधकामांचे दायित्व ३३३ कोटींनी कमी दर्शवून महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.
दायित्व कमी दाखवून तितक्या रकमेची नवीन कामे मंजूर करण्याचा यामागे हेतु असल्याचा आरोप करीत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रभारी आयुक्तांकडे केली आहे. या आरोपांमुळे महापालिकेचा अर्थसंकल्प संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
सुधाकर बडगुजर यांनी प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रस्ते बांधणे लेखशीर्ष २५८५ अंतर्गत कार्यारंभ आदेश दिलेल्या ६१ कामांची मुदत मार्च २०२४ अखेर आहे. या कामांचे दायित्व ६२५ कोटींचे असूनही लेखाधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पात मार्च २०२४ पर्यंत ५७४ कोटींचेच दायित्व दाखवले आहे. त्यात ५१ कोटींची तफावत आहे. दायित्व लपविण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
लेखाशीर्ष २५८७ अंतर्गत पूल व सांडवे बांधणे या यादीत २० कामे आहेत. त्या कामांचीही मुदत मार्च २०२४ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्याचे दायित्व मार्च २०२४ अखेर ३२५ कोटी आहे. मात्र, लेखाधिकाऱ्यांनी मार्च २०२४ अखेर अंदाजपत्रकात केवळ ४३ कोटींचेच दायित्व दर्शविले आहे. त्यात २८२ कोटींची तफावत आहे. हे दोन्ही लेखाशीर्ष मिळून ३३३ कोटींचे दायित्व कमी दर्शविले आहे. यामुळे हे खोटे आकडे दाखवून त्या रकमेची नवीन कामे मंजूर करून महापालिकेची फसवणूक झाली आहे. त्यामुळे दोषींवर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे.
भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशानेच अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचा आरोप बडगुजर यांनी केला आहे. दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच या दोन्ही लेखाशीर्ष खालील कामांचे कार्यारंभ आदेशांच्या प्रती उपलब्ध करण्याची मागणी बडगुजर यांनी केली आहे.