नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून राबवल्या जात असलेल्या जलजीवन मिशनच्या (Jal Jeevan Mission) पाणी पुरवठा योजनांबाबत अनेक वाद-प्रवाद आहेत. या योजनेच्या सर्वेक्षणापासून ते देयक मिळेपर्यंत अनेक उणीवा, त्रुटी समोर आल्या आहेत. ठेकेदारांच्या (Contractor) प्रशासनाबाबत तक्रारीत आहेत, तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ठेकेदारांबाबत तक्रारी आहेत. या सर्व अडचणींवर मात करीत आतापर्यंत जवळपास २०४ कामे पूर्ण झाली असून, अनेक गावांमध्ये नळाद्वारे घरांपर्यंत पाणी आले आहे.
यामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील रहिवाशांना मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांचा जिल्हा परिषद मुख्यालयात येऊन सत्कार केला व योजना राबवल्याबाबत आभार व्यक्त केले. यामुळे जलजीवनच्या कामांच्या तक्रारी असल्या, तरी पूर्ण झालेल्या योजनांबाबत लाभार्थी समाधानीही असल्याचे दिसत आहे.
केंद्र सरकारने मार्च २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन ही योजना सुरू केली आहे. नाशिक जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन यंत्रणाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत १२२२ योजनांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यातील काही योजनांच्या फेरअंदाजपत्रक तयार करण्याच्या निर्णयामुळे ३४ योजना सध्या बंद असल्या तरी उर्वरित योजना सुरू आहेत. यातील २०४ योजनांची कामे पूर्ण झाली असून, १८३ योजनांची कामे अद्याप २५ टक्क्यांच्या आतच आहेत. तसेच २५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान काम झालेल्या योजनांची संख्या २३३ आहे.
पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक व ७५ टक्क्यांच्या आत काम झालेल्या योजनांची संख्या ३३४ आहे. त्यापुढे २२० योजनांची कामे ९० टक्क्यांपर्यंत झाली असून, ४८ योजनांची कामे ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने मार्च २०२४ पर्यंत १००० योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक गावांमधील योजना पूर्ण झाल्यामुळे तेथील नागरिकांना आता नळाद्वारे पाणी मिळत असल्यामुळे समाधानाची भावना आहे. याचा अनुभव नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांना आला.
निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील ३.७३ कोटी रुपयांची योजना पूर्ण झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना आता घरापर्यंत शुद्ध पाणी मिळत असल्यामुळे तेथील नागरिकांच्या वतीने सरपंच, माजी सपंच, सामाजिक कार्यकर्ते आदींनी मुख्यालयात येऊन श्रीमती मित्तल यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच दीपक इकडे, शरद शिंदे, भाऊसाहेब डांगळे, अजित सकाळे आदी उपस्थित होते.