नाशिक (Nashik) : महापालिकेच्या शिवाजीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ अनाधिकृतरित्या जलवाहिनी टाकण्याचा प्रयत्न महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हाणून पाडला असून, ते काम बंद पाडण्यात आले आहे.
ही जलवाहिनी सावरगाव, गंगावर्हे व गोवर्धन या गावांकडे जाते. यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत योजनेसाठीच ही जलवाहिनी टाकली जात असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. मात्र, या जलवाहिनीबाबात ग्रामपंचायत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनांमधून होणरी ३५ ते ४० टक्के गळतीमागे असेच प्रकार असावेत, असे बोलले जात आहे.
गंगापूर धरणातून उचललेले पाणी महापालिकेच्या शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथून शुद्ध केल्यानंतर त्याचे पाणी पुरवठा विभागाच्या वितरण व्यवस्थेमार्फत वितरण केले जाते. पाणी वितरणाचे महापालिकेचे स्वतंत्र जाळे आहे. असे असताना सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्राला लागून ग्रामीण भागातून जवळपास सहा इंची नवीन जलवाहिनी टाकली आहे.
सध्या ग्रामीण भागात जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्याप्रमाणावर कामे सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्या कामाकडे दुर्लक्ष केले. मात्र, जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच मुख्य जलवाहिनीला जोडता येईल, अशा पद्धतीने काम सुरू झाल्याचे बघून पाणी पुरवठा विभागाने कामाला आक्षेप घेतला. संबंधितांकडे पूर्वपरवानगीचे कागदपत्र नसल्याने ते काम बंद पाडण्यात आले.
आता काम बंद असले, तरी ही जलवाहिनी नेमकी कोणत्या यंत्रणेसाठी टाकली जात होती, याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. पाण्याची चोरी करण्यासाठीजलवाहिनी टाकली असावी, असाही एक अंदाज आहे. मात्र, महापलिका याबाबत पोलिसांत तक्रार करीत नसल्याने संशय व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे यांनी या परिसरात त्यांच्या विभागाकडून कोणत्याही योजनेचे काम सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी जिल्हा परिषदेचाही या कामाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. यामुळे ही पाण्याची चोरी नेमकी कोण व कोणत्या कामासाठी करीत असावेत, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.