नाशिक (Nashik) : नाशिक शहरात नो पार्किंगमधील वाहने उचलून नेण्यासाठीचा ठेका १५ मार्चपासून रद्द करून नवीन टेंडर प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान शहर पोलिसांनी जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अंगलट येत असल्याचे दिसताच घाईघाईने तो ठेका रद्द केला असून आता टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वाहने उचलण्यासाठी नवीन ठेकेदार नेमला जाणार आहे.
नाशिक शहारात वाहनतळाची सुविधा अपुरी असताना नो पार्किंगमधील वाहने हटवण्यासाठी नेमलेल्या टोईंग कामगारांकडून होणाऱ्या वादांना नाशिककर वैतागले होते. त्यामुळे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर १५ मार्चपासून टोईंग बंद केले. त्यानंतर पुन्हा टोईंग कारवाईसाठी नवीन ठेकेदार निवडण्याची प्रक्रिया सुरू असून, ती पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होणार आहे. ती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आत जुन्याच ठेकेदाराला मागील आठवड्यात अचानक मुदतवाढ देण्यात आली. त्याविरोधात ओरड होताच दुसऱ्या दिवशी तत्काळ स्थगितीही देण्यात आली.
नाशिक शहरात वाहनतळाची सोय आधी करावी आणि मगच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र, महापालिका त्याकडे दुर्लक्ष करते व वाहतूक पोलीस विभाग नो पार्किंगमधील वाहने उचलण्यावर भर देत आहे. शहर पोलिसांनी नेमलेल्या टोईंग (गाडी उचलणे) ठेकेदाराच्या मनमानीने नाशिककर अधिक त्रस्त झाले होते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी वाहन उचलण्याचा ठेका रद्द केल्याने नाशिककरानी सुटकेचा निश्वास टाकला होता. दरम्यान वाहतूक पोलीस शाखेकडून नवीन ठेकेदार नेमण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असून राजकीय पक्षांशी संबंधीत व्यक्तीला ठेका देऊ नये, अशी नागरिकांची मागणी असताना पोलिसांनी नवीन ठेकेदार निवडण्याची प्रक्रिया सुरू असताना, पुन्हा त्याच ठेकेदाराला मुदतवाढ दिली. त्याने नो पार्किंगमधील वाहने उचलणे सुरू केले. लोकांचा विरोध वाढल्याने शहरात नो पार्किंगचे फलक नसल्याचे कारण देत पोलिसांनी ही कारवाई स्थगित केली. या निर्णयातून शहर पोलिसांमधील असमन्वय दिसून आला आहे. पोलिसांनी महापालिकेला नो पार्किंगचे फलक लावण्याची कार्यवाही करावी, यासाठी पत्र देण्यात आले आहे. दरम्यान, ही मुदतवाढ केवळ १५ दिवसांसाठी असून, निविदा प्रक्रियेद्वारे पुढील कालावधीसाठी नव्याने ठेकेदार निवडण्यात येणार आहे. तसेच ठेकेदाराला देण्यात आलेल्या मुदतवाढीलाही स्थगिती दिल्याचे पोलिस आयुक्त प्रशांत बच्छाव यांनी स्पष्ट केले आहे.